जीवन साफल्यासाठी देह दीर्घकाळ‌ सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे-स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज

0 42

सेलू / नारायण पाटील – मानवी जीवन हा विश्वातील सर्वात अनमोल ठेवा आहे. मानव देह अमूल्य आहे. म्हणूनच जीवनाची सार्थकता, साफल्यप्राप्तीसाठी  देह दीर्घकाळ सांभाळता आले पाहिजे, असे मत श्रीक्षेत्र अयोध्या श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष तथा राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी शनिवारी ( दोन मार्च) सायंकाळी व्यक्त केले.

 

सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था व बी.बी.बिहाणी चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त सहकार्याने श्रीसाई मंदिरात आयोजित श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेचे ४७ वे पुष्प स्वामीजींनी गुंफले. प्रारंभी श्रीरामजी भांगडिया प्रतिमा पूजन व प्रकाश पूजन झाले. ‘जीवन साफल्य ‘ हा स्वामीजींच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सत्यनारायण लोया होते. आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, संयोजक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, प्रा.सुभाष बिराजदार यांची उपस्थिती होती.

 

 

स्वामीजी म्हणाले की; वैदिक पद्धतीने जीवन जगण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती, संयम, संतुलन, आहार-विहार आणि सततचा आत्मविश्वास जागवत ठेवावा लागेल. सतत आपल्या धेय्याप्रती सजग राहिले पाहिजे. असे सांगून स्वामीजींनी  छत्रपती शिवाजी महाराज, संत रामदास स्वामी, रविंद्रनाथ टागोर, संत कबीर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, अब्राहम लिंकन आदीं महापुरुषांच्या जीवनातील धैय्याप्रती कार्याची महानता दर्शविणारी उदाहरणे सांगितली. हिंदू राष्ट्र, हिंदवी राज्याची स्थापना म्हणजेच हिंदू साम्राज्याची स्थापना होय, असेज्ञस्वामीजींनी स्पष्ट केले. ज्या वयात चेतना जागृत असतात. तोपर्यंत आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावे लागतातच, असे नमूद करून आनंददायी जीवनासाठी भगवंतांची भक्ती आवश्यक आहे. भक्तीने जीवन धन्य होते. वैदिक पद्धतीने शंभर वर्षे जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने देहाचा सांभाळ करणे आवश्यक आहे, असेही स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी नमूद केले.

 

 

प्रास्ताविक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक सुभाष बिरादार‌ यांनी केले. प्रारंभी अशोक लिंबेकर यांनी स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त
रचित ”देवदेह झाला
अवघा आनंद
मुखी नाम घ्या हो
गोविंद…गोविंद…” हे गीत सच्चिदानंद डाखोरे, गिरीश दीक्षित, गंगाधर कान्हैकर व संचाने स्वागत गीत गायीले. याप्रसंगी राज्य सरकारचा उत्कृष्ट उद्योजक पुरस्कारप्राप्त नंदकिशोर बाहेती यांचा सत्कार तसेच वाढदिवसानिमित्त जयप्रकाश बिहाणी यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले. साईबाबा मंदिर संस्थानच्या वतीने माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी सत्कार केला. यावेळी मुकेश बोराडे, राजेंद्र पवार, मिलिंद सावंत, प्रभाकर सुरवसे आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे सदस्य, शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. व्याख्यानाला महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!