एसआयटीमधील दोन अधिकाऱ्यांबाबत जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक आरोप होत असून चौकशीतही धक्कादायक खुलासे होत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी आणि एसआयटीकडे तपासाची सूत्रे आहेत. तर, दुसरीकडे या प्रकरणाच्या तपासात सहभागी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर शंका उपस्थित केली जात आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधीमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे सीआयडी आणि एसआयटीने हाती घेतली. त्यानंतर तपासाला वेग आला आणि आरोपी जेरबंद होण्यास सुरुवात झाली आहे. तर, दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्ये उठबस असणारा वाल्मिक कराड हा या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत आहे. वाल्मिक कराड हा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप होत आहे. आता, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केला आहे.
जितेंद्र आव्हाड, खा. सोनवणे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडचा एक फोटो एक्सवर शेअर केला आहे. ज्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) महेश विघ्ने आणि वाल्मिक कराड एकत्र दिसत असल्याचा आरोप केला जात आहे. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेचा निकाल लागला होता. त्यादिवशी धनंजय मुंडेंच्या विजयाचा जल्लोष साजरा करतेवेळी हा फोटो काढण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या फोटोवरून वाल्मिक कराड आणि पीएसआय महेश विघ्ने यांचे जवळचे संबंध असल्याचे बोलले जात आहे.
एसआयटीमध्ये महेश विघ्नेंचा समावेश
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेल्या एसआयटीमध्ये हेच महेश विघ्ने असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, “संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SIT मधे एक प्रमुख IPS बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पाहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन् प्रेमाचे संबध आहेत पहा. हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील? याच विघ्ने याने निवडणूक काळात धंनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे काम केलेले आहे.”
जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, मनोजकुमार वाघ हा वाल्मिक कराडचा आत्यंत खास माणूस असून गेले 10 वर्षे तो बीड LCB मध्येच आहे आणि वाल्मिकसाठी काम करतोय असेही आव्हाड यांनी म्हटले.