भाजपा आमदारांच्या मामाचं अपहरण…
विधान परिषदेचे भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण झालं आहे. सतीश वाघ असं त्यांच्या मामाचं नाव आहे. शेवाळ वाडीतून हे अपहरण झालं. सोमवारी (दि. ०९) सकाळच्या सुमारास वाघ यांच्या सोलापूर रस्त्यावरील हॉटेल समोर थांबले असता एका चारचाकी गाडीतून त्यांचं अपहरण झालं. या प्रकरणी पोलीसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
संबंधित घटना ही आज सकाळच्या सुमारास घडली. सतीश वाघ हे सोलापूर रस्त्यावर असलेल्या ब्ल्यू बेरी हॉटेलबाहेर थांबले होते. यावेळी अचानक शेवरलेट एन्जॉय ही गाडी आली. या गाडीतून दोन जण बाहेर आले. त्यांनी आधी सतीश वाघ यांच्याशी बातचित करण्याचं नाटक केलं. त्यांनी सतीश वाघ यांना काहीतरी विचारपूस करण्याचं नाटक केल्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांनी बळजबरी सतीश वाघ यांना गाडीत बसवलं. यानंतर ते सतीश वाघ यांना अज्ञातस्थळी घेऊन गेले. आरोपी नेमके कोण होते? त्यांचा सतीश वाघ यांचं अपहरण करण्यामागे नेमका उद्देश काय होता? त्यांनी सतीश वाघ यांचं अपहरण नेमकं का केलं? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.
पोलिसांकडून शोध सुरु
बराच वेळ झाल्याने सतीश वाघ घरी आले नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्यांच्या मुलाने शोधाशोध केली. पण वडील मिळत नसल्याने त्यांनी हडपस पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरात शोधाशोध केली. या दरम्यान ब्ल्यू बेरी हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी आणि त्यांची गाडी कैद झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. आता पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत. आरोपी कोण होते, त्यांचा उद्देश काय होता? याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, पोलीस या प्रकरणी आता काय-काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं आहे.