महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल…प्रदेशाध्यक्षपदी…
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. नाना पटोले यांना पक्षांतर्गत विरोध वाढल्यानंतर त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेतली जाणार असल्याचे समजते. तसंच काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनीही आपण गटनेतेपदावर राहण्यास इच्छुक नसल्याचं पक्षश्रेष्ठींना कळवल्याने त्यांच्या जागी लवकरच नवा गटनेता नेमला जाणार असल्याची माहिती आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातही सत्तांतर होणार असल्याचा दावा राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीमुळे पक्षातील काही नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष असून तो आता उघडपणे बाहेर येऊ लागला आहे. काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्याकडे पटोले यांची तक्रार केली होती. त्यानंतर आता विदर्भातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सुनील केदार आणि शिवाजीराव मोघे हे नेते पटोलेंना पदावरून हटवावं, या मागणीसाठी दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्यामुळे पटोले यांच्या जागी सर्वांना मान्य असेल आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने नेते आणि पदाधिकाऱ्यांना जोडून ठेवू शकेल, असं नेतृत्व महाराष्ट्र काँग्रेसला देण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसचे विविध जिल्ह्यांमध्ये अनेक मातब्बर नेते आहेत. त्यामुळे नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड करताना पक्षनेतृत्वाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत असणाऱ्या नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सतेज पाटील, सुनिल केदार, यशोमती ठाकूर यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र या स्पर्धेत सध्या तरी यशोमती ठाकूर या सगळ्यात पुढे असल्याचे समजते. स्थानिक राजकारणावर पकड आणि प्रदेश पातळीवरील कामाचा अनुभव या यशोमती ठाकूर यांच्या जमेच्या बाजू आहेत. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतही यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत काँग्रेसचा विजयी झेंडा फडकवला होता.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्याने राज्य आणि केंद्रीय पातळीवरील नेत्यांमध्ये समन्वय राखण्याच्या दृष्टीने राज्य प्रभारीपदाचं महत्वही वाढलं आहे. अशातच काँग्रेसचे सध्याचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील हे आपल्या पदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता आहे. कारण कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पाटील हे आमदार म्हणून निवडून आले असून त्यांचा राज्य मंत्रिमंडळातही समावेश केला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केरळमधील रमेश चेन्निथला यांची महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी म्हणून निवड होऊ शकते.