सर्वात मोठी बातमी …..मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना
मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोकाची गंभीर टीका केल्यानंतर मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मराठा कार्यकर्ते जरांगे पाटलांच समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, फडणवीसांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर आंदोलन करण्याची जरांगेंची भूमिका असून ते उपोषण स्थळ सोडून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. सध्या आंतरवाली सराटीमध्ये प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने
मनोज जरांगे पाटील सध्या आंतरवाली सराटीतील आंदोलन स्थळावरून निघून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नालेवाडी गावापर्यंत पोहोचले आहेत. सागर बंगल्यावर जाऊन आंदोलन करण्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. दरम्यान, मुंबईच्या दिशेने निघाले असताना अशक्तपणामुळे जरांगे पाटील यांना भोवळ आली, त्यामुळे येथे प्रचंड गदारोळ पाहायला मिळत आहे.
जरांगे पाटील मुंबईला जाण्यावर ठाम
मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा आणि मुंबईकडे जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं असलं तरी, जरांगे पाटील मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. गेल्या दोन दिवसांपासून आक्रमक भूमिका घेत आहेत. गेल्या काही दिवसांत मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात काही पत्रकार परिषद घेण्यात आल्या, ज्यामध्ये त्यांच्यावर आरोप करण्यात आले, यानंतर जरांगे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सरकार विशेषत: फडणवीसांचे हे षडयंत्र असून आपली बदनामी करण्याचा त्यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला आहे.