..तर राज्यात फिरू देणार नाही,मनोज जरांगे पाटील यांचा मुंडेना इशारा
परभणी,दि 04 ः
संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना यापुढील काळात धमक्या देण्याचे प्रकार आढळून आल्यास परळीतील त्या त्या नेते मंडळींना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी येथे दिला. मंत्री धनंजय मुंडे यांनी यांचा राजीनामा तातडीने घेण्यात यावा, अशी मागणीदेखील मोर्चाद्वारे करण्यात आली.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवरही कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. जिंतूर रोडवरील नूतन शाळेपासून निघालेला हा मोर्चा सुभाष रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, स्टेशन रोड, नारायण चाळ मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आला. या ठिकाणी झालेल्या जाहीर सभेत मनोज जरांगे, आमदार सुरेश धस, खासदार संजय जाधव, आ. डॉ. राहुल पाटील, आ. राजेश विटेकर, आ. संदीप क्षीरसागर, नरेंद्र पाटील, ज्योती मेटे, वैभवी देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना संतोष देशमुख यांच्या हत्येचे आरोपी आजही मोकाट फिरत आहेत. या संपूर्ण प्रकारात अनेक दिवस राज्यातच सोयीने फिरत असलेला आणि नाट्यमयरित्या शरण आलेल्या वाल्मीक कराड याच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज असताना त्याला पोलीस कोठडीतही मदत केली जात आहे. सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय यांना पोलीस ठाण्यातच काही मंडळींकडून धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे यापुढील काळात असे प्रकार घडले घडल्यास मंत्री धनंजय मुंडे यांना राज्यात फिरू दिले जाणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.