मराठा आरक्षण आंदोलन पेटले..आमदार प्रकाश सोळंके यांच्या गाड्या पेटवल्या; घरावर दगडफेक
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात आंदोलकांनी प्रकाश सोळंके यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या सर्व गाड्या आंदोलकांनी पेटवल्या. या प्रकरामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहे. अशातच बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा आंदोलक आक्रमक झाले असून राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळूंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करण्यात आली. यावेळी काही आंदोलकांनी बंगल्याच्या पार्किंगला आग लावली. या आगीत सोळुंके यांच्या कारसह बंगल्याला देखील आग लागली. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
बंगल्याला आग
माजलगावमधील मराठा आंदोलनाला पुढे हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी आक्रमक होत सोळंके यांच्या बंगल्याजवळ असलेल्या पार्किंगला आग लावली तेव्हा आगीचे लोट बंगल्यापर्यंत पोहचले. आगीने संपूर्ण बंगल्याला विळखा घातला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये.
मी मराठा समाजाचाच आमदार, आरक्षणाला माझा पूर्ण पाठिंबा : आमदार प्रकाश सोळंके
आमदार प्रकाश सोळंके बोलताना म्हणाले की, “मी माजलगावमध्येच आहे. मी घरातच आहे. आज सकाळी अचानक काही आंदोलक माझ्या घरी आहे. माझ्या घरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. घराचं, ऑफिसचं आणि गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. आपल्या माध्यमातून मी सर्व आंदोलकांना विनंती करणार आहे की, मी मराठा समाजाचाच आमदार आहे आणि माझाही मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. आरक्षण मिळावं अशी माझीही मागणी आहे. काही राजकीय विरोधक असतात जे काही बाबतीत चिथावणी करु शकतात. माझा कोणत्याही आंदोलकांवर राग नाही, मी त्यांच्या भावना समजू शकतो की, त्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे अशा बाबतीत राजकीय विरोधक संधी घेतात, असाच प्रकार याबाबतीत झाला असल्याचं मला वाटतं.”
मला आंदोलकांशी बोलण्याची संधीच मिळाली नाही, थेट घरावर दगडफेक सुरू झाली : आमदार प्रकाश सोळंके
“मला आंदोलकांशी बोलण्याची संधीच मिळाली नाही. माझ्या घरावर थेट दगडफेक करायला सुरुवात केली. कोणी काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हतं. माझ्या घराला चारही बाजूंनी वेढा दिला. त्यामुळे चर्चा करण्याचा प्रश्नच आला नाही. मी पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून विनंती करतो की, माझाही मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा आहे. मीसुद्धा मराठा समाजाचाच आमदार आहे. काहीजण अर्धवट क्लिप काढून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. हेच माझ्याबाबतीत घडलं आहे. सर्व आंदोलकांना माझी हात जोडून विनंती आहे, यांच्याच प्रेमाच्या जोरावर मी आमदार झालो आहेत. माझा मराठा समाजाच्या मागणीला पूर्ण पाठिंबा आहे.”, असं प्रकाश सोळंके म्हणाले.