तीन बहिणींची दोन चिमुरड्यांसह सामूहिक आत्महत्या; व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत सांगितलं धक्कादायक कारण
एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींनी त्यांच्या दोन चिमुरड्यांसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. तिन्ही बहिणींचे लग्न एकाच घरात झाले होते. सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. तीनपैकी दोन महिला गर्भवती होत्या. तर, मृत मुलांपैकी एकाचे वय चार वर्षे आणि दुसऱ्याचे वय अवघे २७ दिवस आहे. या सामुहिक आत्महत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काली देवी (२७), ममता मीणा (२३) व कमलेश मीणा (२०) या बहिणी, हर्षित (४) आणि वीस दिवसांचा बालक अशी मृतांची नावे आहेत. या तिन्ही बहिणींची विवाह एकाच कुटुंबात झाला असून सासरचे लोक त्यांचा छळ करत असल्याचा आरोप आहे. आत्महत्येपूर्वी एका बहिणीने व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवलं होतं. सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं यात लिहलं होतं.तिन्ही बहिणींपैकी एकीने आत्महत्येपूर्वी व्हॉट्सअॅपवर स्टेटस पोस्ट केलं होतं. आम्हाला जगायचंय पण सासरच्या त्रासापेक्षा मरण चांगलं आहे. या सगळ्यात आमच्या आई- वडिलांचा काहीच दोष नाहीये. आम्ही जातोय.. आता खुश राहा. आमच्या मृत्यूचं कारण आमच्या सासरचे लोक आहे. रोज रोज मरण्यापेक्षा आम्ही एकत्रच जीव देतोय. हे देवा पुढच्या जन्मी आम्हा बहिणींना एकाच घरात पुन्हा जन्म दे, असं स्टेटस व्हॉट्सअॅपवर पोस्ट केलं होतं.तीन बहिणींनी त्यांच्या दोन मुलासह घरापासून दोन किलोमीटर दूर असणाऱ्या शेतातील विहीरीत उडी घेत आत्महत्या केली. मृतांमध्ये २० दिवसांच्या चिमुरड्याचाही समावेश आहे. दोन बहिणी गर्भवती होत्या. त्यातील एक महिला येत्या गुरुवारी प्रसूत होणार होती. मात्र त्यापूर्वीच त्यांनी हे कठोर पाऊल इचललं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही बहिणी अभ्यासात हुशार होत्या. त्यातील एकीने जयपूरच्या विद्यापिठात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. तर, ममता पोलिस कॉन्स्टेबलच्या परीक्षेची तयारी करत होती. तर, मोठी बहिण कालू बीएच्या शेवटच्या वर्षाची तयारी करत होती. तर, तिन्ही बहिणींचे पतीचे शिक्षण पाचवी- सहावीपर्यंत झाले होते. व दारुच्या नशेत ते तिघींना मारहाण करत असे.