अडीच महिन्यांच्या लेकराला घेऊन आमदार अहिरे विधानभवनात!
नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालंय. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे-वाघ या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधान भवनात पोहोचल्या. “मी आई आहेच, सोबत आमदारही आहे. त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्वाचे आहेत, त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले” अशा भावना अहिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या.
सरोज अहिरे या नाशिकच्या देवळालीच्या राष्ट्रवादीच्या आमदार आहेत. नाशिक मधील दंतरोगतज्ञ डॉ.प्रवीण वाघ यांच्याशी फेब्रुवारी २०२१ ला त्यांचा विवाह झाला. अडीच महिन्यांपूर्वी त्यांनी गोड बाळाला जन्म दिला. प्रशंसक प्रवीण वाघ असं बाळाचे नाव आहे. ३० सप्टेंबरला त्याचा जन्म झाला. त्यानंतर प्रथमच अधिवेशन असल्याने सरोज अहिरे बाळ आणि पती प्रवीण वाघ आणि अन्य कुटुंबीयांसह विधानभवनात पोहोचल्या. कुटुंबीय बाळाला सांभाळतील त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्न मांडणार आहे. अधिवेशन किती दिवस चालेल माहिती नाही, लोकांचे अधिकाधिक प्रश्न सोडवण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोण आहेत सरोज अहिरे?
सरोज अहिरे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देवळाली मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या युवा आमदारांमध्ये त्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं.
मतदारसंघात जनतेशी नाळ असलेल्या आमदार म्हणून त्या सुपरिचित आहेत.
कोण आहेत सरोज अहिरे यांचे पती?
चोरडिया चोपडा नगर येथे वास्तव्यास असलेल्या कल्पना आणि रामदास वाघ यांचे चिरंजीव डॉ. प्रवीण वाघ
प्रवीण वाघ हे नाशिकमधील प्रसिद्ध दंतरोगतज्ज्ञ आहेत. फेब्रु. २०२१ ला सरोज अहिरे यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला.