मनसेने वसंत मोरेंना हटवल; पुणे शहराध्यक्षपदी साईनाथ बाबर

0 111

 

पुणे,दि 07 ः मशिदीवरील भोंग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेचे डॅशिंग नगरसेवर वसंत मोरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षांतर्गत धुसफूस वाढत असतानाच वसंत मोरे यांना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवण्यात आले आहे. राज ठाकरे यांची सही असलेला आदेश पक्षातर्फे जारी करण्यात आला आहे. मनसे नगरसेवक साईनाथ बाबर  यांच्याकडे आता पुणे शहर प्रमुखपदाची धुरा देण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसेच्या पुणे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

आधी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडला

याआधी वसंत मोरेंनी पुण्यातील उपविभाग प्रमुख आणि उपशहर प्रमुखांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपही सोडला होता. पक्षसंघटनासाठी बनवलेल्या ग्रुपवर कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. अखेर चर्चा टाळण्यासाठी वसंत मोरेंनी ग्रुप सोडणं पसंत केलं होतं. एका उपविभाग प्रमुखाच्या पोस्टवरुन ग्रुपमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर मोरेंनी ग्रुप सोडला आणि सिंहासनावर बसलेला फोटो व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला शेअर केला होता.

पुण्याचे मनसे पदाधिकारी मुंबईत

पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अंतर्गत धूसफूस मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं चित्र आहे. त्यानंतर पुण्यातील मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी मुंबईत दाखल झाले. पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी वेगळ्या कारणासाठी निरोप पाठवल्याचं सुरुवातीला सांगितलं जात होतं. मात्र पुण्यातील नाराजीसंदर्भात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्याची शक्यता आहे. वसंत मोरेंना याबाबत कोणताही निरोप देण्यात आलेला नव्हता. त्यानंतर वसंत मोरेंना शहर प्रमुख पदावरुन हटवण्यात आल्याचं वृत्त आहे.

वसंत मोरेंची अडचण काय?

वसंत मोरे पुण्यातील कात्रज प्रभागातून  गेल्या 10 वर्षांपासून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. वसंत मोरे जातीने मराठा आहेत. मात्र त्यांच्या प्रभागातील मुस्लिम मतदार वसंत मोरेंच्या कामामुळे त्यांच्या पाठीशी राहिला आहे. कात्रज प्रभागात मुस्लिमांची 3 हजार 800 मतं आहेत आणि हीच मतं गेमचेंजर ठरतात. त्यामुळे वसंत मोरेंची अडचण झाल्याचं बोललं जात होतं.

वसंत मोरेंची प्रतिक्रिया

दरम्यान, “मी अकरा महिन्यांसाठीच शहरध्यक्षपद राज ठाकरे यांच्यकडून मागून घेतले होते. साईनाथ बाबर यांची निवड झाली आहे. मला अनेक पक्षांच्या ऑफर आहेत. मी मात्र मनसेतच राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार नाही. पक्षाचा कार्यकर्ता आहे. पक्षातच राहीन”, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.

गुढी पाडव्याला राज ठाकरेंनी ही भूमिका मांडल्यानंतर मनसेच्याच काही मुस्लीम कार्यकर्त्यांनी देखील आपली नाराजी बोलून दाखवली आहे. राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात अलेल्या ठिकाणी त्यांचं नाव देखील खोडून टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी भूमिकेला विरोध केला होता. वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर या दोघांच्या प्रभागात जवळपास ७० टक्के मुस्लिम मतदार आहेत. त्यात राज ठाकरेंनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना भेटीसाठी बोलावलं असताना वसंत मोरेंना टाळल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. ती शक्यता आता खरी ठरली आहे.

error: Content is protected !!