कालपर्यंत माझं नाव होतं, पण…धक्कादायक… सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले..

1 61

नागपूर,दि 16 ः
भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची देखील महायुती सरकारमधील मंत्रिपदाची संधी हुकली असल्याचे कालच्या नागपुरातील मंत्रिमंडळ विस्तारात पाहायला मिळाले. या विस्तारात अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू देण्यात आल्यानंतर अनेक बड्या नेत्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देत, अनेक दिग्गजांना डावलण्यात आलं आहे. त्यामध्ये, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 5 वरिष्ठ नेत्यांना मंत्रीपदातून वगळले आहे. तर, भाजपनेही शिंदे सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या 4 नेत्यांचा पत्ता कट केला आहे. त्यामध्ये, भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि रविंद्र चव्हाण यांचाही समावेश आहे. मात्र, रविंद्र चव्हाण यांना भाजपकडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. मग, सुधीर मुनगंटीवार यांचं काय होणार, सुधीर मुनगंटीवारांना नेमकं कशामुळे मंत्रिपद नाकारण्यात आलं, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच, सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar) हे भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या भेटीला गेले होते. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये दीडतास चर्चा झाली असून त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.
यावेळी माध्यमांनी मुनगंटीवारांना नाराज आहात का? असा प्रश्न केला असता ते म्हणाले, ‘मी व्यथित असण्याचं कारणच नाही आणि मी कधीच व्यथित होत नाही. पक्ष मला जे पद देतो, मी त्या पदासाठी काम करतो. फक्त एवढीच इच्छा आहे, मंत्रिमंडळात माझं नाव आहे, असं सांगण्यात आलं आणि काल ते नव्हतं. एवढाच मुद्दा आहे. कालपर्यंत नाव असताना अचानक ते का वगळण्यात आलं? ते मला माहिती नाही. बाकी मला याबद्दलची कोणतीही माहिती नाही’, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी अधिक बोलणं टाळलं. पुढे ते असेही म्हणाले, मी व्यथित नाही. मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये मी गोरगरिबांचे विषय मांडायचो. आग्रहपूर्वक मांडायचो. आता विधानसभेत मांडेल. दरम्यान तुमचं नाव मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं का? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांना केला असता, ते म्हणाले, “मग तेच खरं. कारण ते सर्व त्यांनाच माहिती असणार आहे. त्यांनी सांगितलं आहे तर मग माझ्याकडून उत्तर का घेत आहात? माझं वरिष्ठ पातळीवर कुणाशी बोलणं झालं नाही. पण तुमचं झालं आहे ना, तुम्ही वरिष्ठ पातळीवर काहीतरी बोललात ना की माझ्यासाठी संघटनेचं काहीतरी पद ठेवलं आहे म्हणून”, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
नितीन गडकरी हे माझे मार्गदर्शक आहे, म्हणून आज त्यांची भेट घेतली. मला मंत्रिमंडळात नाव आहे असं सांगण्यात आलं होतं, पण मी आज मंत्री नाही. तरीही, मी नाराज असण्याचं कारण नाही. कारण, काल जे आपल्यापाशी होतं ते उद्या जाणार आहे. उद्या जे आपल्यापाशी नसेल ते परवा येणार आहे, याची मला जाणीव आहे, असे म्हणत मी नाराज नसल्याचं सुधीर मुनगंटीवर यांनी म्हटलं. मात्र, किशोर जोगरेवार, गणेश नाईक यांचा संदर्भ देत, ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षात जाऊन लढला त्यांनाही मंत्रिपद दिलं जातं, असे म्हणत अप्रत्यक्षपणे त्यांनी मनातील खदखद बोलून दाखवली.

error: Content is protected !!