‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारतास विश्वगुरु बनवेल’-प्राचार्या डॉ.स्मिता देशमुख यांचे प्रतिपादन
परभणी,दि 20 (प्रतिनिधी)ः
येणाऱ्या वर्षांपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० लागू होणार आहे. प्रस्तुत धोरणात विद्यार्थी, शिक्षक आणि महाविद्यालय यांच्यातील मूलभूत बदल सुचवले आहे. जेणेकरून आपले शिक्षण जागतिक पातळीवर जाऊन विद्यार्थ्यांना विचार करायला लावेल आणि स्वयंपूर्ण बनवेल. तंत्रज्ञान आणि अंतरविद्याशाखीय शिक्षणाला प्रोत्साहन देणारे हे शैक्षणिक धोरण भारताला विश्वगुरु बनवेल अशी अपेक्षा नॅकच्या कार्यकारी सदस्य तथा प्राचार्या डॉ.स्मिता देशमुख यांनी व्यक्त केली.
दिनांक २० (सोमवार) रोजी श्री शिवाजी महाविद्यालय आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’ याविषयावर अर्ध-ऑनलाईन पद्धतीने आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, शिक्षण तज्ज्ञ प्रा.डॉ.डी. एन.मोरे, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्या डॉ.विजया नांदापूरकर, समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे तसेच प्रबंधक विजय मोरे यांची उपस्थिती होती.
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-उच्च शिक्षणाच्या संदर्भात’ या विषयावर बोलताना डॉ.देशमुख पुढे म्हणाल्या, या धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. या बदलासाठी शिक्षण क्षेत्राने तयार राहावे. व्यावसायिक कौशल्य, तंत्रज्ञान आधारित शिक्षण, संशोधन, भाषा, संस्कृती, ऑनलाइन मूल्यमापन इत्यादीचा अंतर्भाव असलेले धोरण स्त्री सबलीकरणासाठी प्रोत्साहन देणारे असल्याचे त्यांनी सांगितले. उदघाटन प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव म्हणाले, येणारा काळ शिक्षक आणि महाविद्यालयासाठी परीक्षेचा काळ असेल. नवीन धोरणाला स्वीकारण्यासाठी आपल्याला अंतरविद्याशाखीय रूपाने तयार राहणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सदरील चर्चसत्रासाठी महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवर ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
या राष्ट्रीय चर्चासत्राच्या पहिल्या सत्राच्या मार्गदर्शकांचा परिचय डॉ.उत्कर्ष किट्टेकर यांनी तर सुत्रसंचलन प्रा.डॉ.जयंत बोबडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.रामदास टेकाळे, डॉ.सुरेंद्र येनोरकर, डॉ.सबिहा सय्यद, डॉ.सचिन येवले, डॉ.गणेश चालींदरवार, डॉ.विजय कळमसे, प्रा.शरद कदम, सय्यद सादिक तसेच साहेब येलेवाड आदींनी प्रयत्न केले.