उद्योग विभागाच्यावतीने प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावेः उदय सामंत
रत्नागिरी, दि. ३० राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणीच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागाने पुढाकार घेतला असून प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा घेण्याचे निश्चित केले आहे. रोजगार मेळाव्याचा प्रारंभ १२ फेब्रुवारीपासून रत्नागिरी जिल्ह्यातून करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी येथील शिर्के हायस्कूलमध्ये पहिला रोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात सुमारे पाच हजार तरुण सहभागी होण्याची शक्यता असून त्यापैकी सुमारे दोन हजार जणांना तत्काळ रोजगार दिल्याचे प्रमाणपत्र अदा केले जाणार आहे. या मेळाव्यासाठी राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय तसेच स्थानिक कंपन्या सहभागी होणार आहेत. वय १८ वर्षे व पाचवी ते पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सर्व घटकांना या मेळाव्यातून रोजगार दिला जाईल, असे उद्योगमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी जिल्ह्यानंतर राज्याच्या इतर जिल्ह्याता रोजगार मेळाव्या घेण्याचे उद्योग विभागाने निश्चित केले आहे. त्यानुसार सर्व जिल्ह्यात हे मेळावे होणार आहेत. अधिकाधिक तरुणांना रोजगाराची संधी याद्वारे दिला जाणार आहे.