परभणीत श्रीमती शांताबाई मानवतकर स्मृती संगीत समारोहाचे आयोजन
परभणी / प्रतिनिधी – येथील डॉ.रवींद्र मानवतकर, डॉ.संध्या मानवतकर यांच्यावतीने श्रीमती शांताबाई मानवतकर स्मृती संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील तेरा वर्षापासून शास्त्रीय संगीताचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, यावर्षी वार रविवार दि.१५ डिसेंबर२०२४ रोजी सायंकाळी पाच(०५)वाजता श्री शिवाजी महाविद्यालय सभागृह,परभणी या ठिकाणी हा संगीत समारोह संपन्न होणार आहे.
भारतीय संस्कृतीचा एक अमूल्य असा ठेवा असलेल्या शास्त्रीय संगीताच्या या कार्यक्रमात यावेळी गायन व वादन असे दोन्ही प्रकार सादर होणार आहेत. तसेच गायनामध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय दोन्ही प्रकार सादर होणार आहेत. संगीत समारोहात सहभागी होणारे प्रसिद्ध कलाकार कृष्णराज लव्हेकर हे रागसंगीत सादर करणार असून श्रीमती सावनी तळवलकर भदे या तबला सोलो तर श्रीमती उत्तरा जावडेकर पेंडसे या नाट्यसंगीत सादर करणार आहेत.
त्यांना साथसंगत पंकज शिरभाते(व्हायोलिन), संजय सुवर्णकार (तबला), मंगेश जवळेकर (संवादिनी), कृष्णराज लव्हेकर(संवादिनी) तर या कार्यक्रमाचे निवेदन सौ. रोहिणी गोरे करणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन डॉ . रवींद्र मानवतकर व डॉ.संध्या मानवतकर यांनी केले आहे.