पंकुताई…धनुभाऊं म्हणत आ.सुरेश धस बरसले..बोगस मतांवरची तुमची निवडणूक…

0 33

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणाऱ्या वाल्मिक कराड यांचं नाव येत आहे. अशातच या प्रकरणावरून बीडमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी बोलताना संताप व्यक्त केला आहे.

सुरेश धस काय म्हणाले?

धस म्हणाले, बीड जिल्ह्यात धनुभाऊ १ लाख ४२ हजार मतांनी निवडून आल्याचं सांगता पण शाई एकानं लावायची आणि ३३० बुथपैकी २३० बूथ जर ताब्यात असतील तर? बोगस…बोगस मतांवरची तुमची निवडणूक आहे. राजासाहेब देशमुख इथं आहेत मतदानाच्या दिवशी यांना बदडलं, अॅड. माधव जाधवला बदडलं, कुठेही गेलात तरी तुम्ही गोळीबार करता. बाराशे-तेराशे बंदुकीचं लायसन्स बीड जिल्ह्यात दिली आहेत. ही लायसन्स ज्या कलेक्टरनं दिलीत, ज्या पोलीस अधीक्षकांनी आणि ज्या डीवायएसपींनी त्याला मान्यता दिली या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे.

पंकुताई तुमची जी हुजूरी करणार नाही

यावेळी आमदार सुरेश धस म्हणाले, १२ डिसेंबर रोजी तुम्ही गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीसाठी तुम्ही गोपीनाथ गडावर आला होतात. पण वाकडी वाट करून तुम्ही संतोष देशमुखच्या घरी का नाही गेलात? गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या काळात मटक्याचा खटका बसवला. मुंबईतील गँगवॉर उध्वस्त केलं. त्यांच्याबरोबर मी १० वर्ष काम केलं. पण तुमच्याबरोबरचा अनुभव वेगळा आहे. पंकजा मुंडेंना चांगले माणसं नकोत. त्यांना जी हुजूरी करणारी माणसं लागतात. आमची अवलाद जी हुजूरी करणारी नाही. भले राजकारणातून बाजूला जाऊ.

धनुभाऊंनी पंकुताईंचं सगळंच काढून घेतलं

“बीडमध्ये अवैधरितीने वाळू आणि राख वाहून नेली जाते. अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला तर त्यांना पिस्तुल दाखवली जाते. अशाप्रकारचं वातावरण बीडमध्ये आहे. चार अधिकाऱ्यांचं त्यांच्यासमोर काय चालणार? एक रुपयाही सरकारला न देता २००२ पासून फुकट राख उचलली जात आहे. पंकजा मुंडे २०१४ ते २०१९ मध्ये सत्तेत होत्या. तरीही हे का बंद झाले नाही?”, असाही सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला. याचं कारण सांगताना सुरेश धस पुढं म्हणाले, परळीत धनुभाऊंचं घर वर आहे, पंकुताईंचं घर खाली आहे. राख-रेती उचलणआरे लोक सकाळी चहाला खाली असतात, नाश्त्याला वर असतात. पंकुताई तुमचं सगळंच धनुभाऊंनी काढून घेतलं, तुम्हाला मेळच लागला नाही.

error: Content is protected !!