परभणीत बेटी बचाओ – बेटी पढाओ योजना दशकपूर्ती अभियानाचा शुभारंभ

0 1

परभणी – दि. 22
बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमामुळे लिंगभेद चाचणी पध्दतीना प्रतिबंध करण्यासाठी तसेच मुलींचे संरक्षण आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्सहान देण्यासाठी महत्वपुर्ण योगदान मिळाले आहे. बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाला दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी 10 वर्षे पूर्ण होणार असल्याने राज्यात दिनांक 22 जानेवारी 2025 ते दिनांक 8 मार्च 2025 या कालावधीत बेटी बचाओ – बेटी पढाओ योजना दशकपूर्ती अभियानाचा शुभारंभ झाला असून या निमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी रेखा काळम यांनी दिली.

बुधवार दि. 22 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन सभागृह, परभणी येथे बेटी बचाओ – बेटी पढाओ योजना दशकपूर्ती सोहळा शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी अनुराधा ढालकारी, महिला व बाल कल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी रेखा काळम, मनपा च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना सावंत, जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी – कर्मचारी, सखी वन स्टॉप सेंटर परभणी, चाईल्ड हेल्प लीने 1098 चे सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

दशकपूर्ती सोहळ्या निमित्त या प्रकारे राबविण्यात येतील उपक्रम
विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम, किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी विषयी जनजागृती तसेच सॅनिटरी पॅडचे वितरण, वृक्षांची लागवड, विविध खेळ, महिला पोलिस यांच्या मदतीने सायकल, मोटरसायकल रॅली, सक्षम अंगणवाडी, पोषण 2.0, मानसिक स्वास्थ्य, कौशल्य विकास कार्यक्रम अशाप्रकारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत.परंतु ग्रामीण भागात आर्थिक विवंचना व इतर कारणांमुळे लवकर विवाह होण्याचे प्रमाण दिसते त्यांना जागृत करणे आपले काम आहे. बेटी बचाओ – बेटी पढाओ कार्यक्रम ग्रामीण भागात दृश्य स्वरूपात राबविण्यात यावा. बाल विवाह थांबविणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.
रघुनाथ गावडे
जिल्हाधिकारी, परभणी

समाजात आणखी सुद्धा मुलगा आणि मुलगी असा भेदभाव असल्याचे दिसते. माझा भाऊ आणि माझ्या वडिलांचे बारावी पर्यंत शिक्षण झालेले, ग्रामीण भागातील सर्वसामान्य परिस्थिती मधून आपण आलोत परंतु त्यांनी मला आधार दिला नसता तर आपण भारतीय प्रशासन सेवे मध्ये आलो नसतो तेव्हा सर्वानी मुलगा फक्त वंशाचा दिवा न समजता मुलगी देखील कमी नाही त्यामुळे दोघांना समान वागणूक द्यावी. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत.
नतिशा माथुर
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, परभणी

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बाल कल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम यांनी केले. ग्रामीण भागातील मुली आणि महिलांना सक्षम करणे गरजेचे आहे. मुलींचा जन्मदर कशा पद्धतीने वाढला पाहिजे, बाल विवाह निर्मूलनाची चळवळ जिल्ह्यात सर्वांच्या सहकार्यांने शक्य होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली बेटी बचाओ – बेटी पढाओ ची शपथ
यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बेटी बचाओ – बेटी पढाओ बाबत शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सदरची शपथ उपस्थितांना दिली तसेच स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभ देखील करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना मनतकर यांनी तर आभार मंगल गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

error: Content is protected !!