पत्नी पीडित पुरूषांनी साजरी केली पौर्णिमा; सातजन्मी सुद्धा अशी बायको नको
पत्नी पीडित नवरोबांच्या पिंपळाच्या झाडाला 121 उलट्या फेऱ्या
छत्रपती संभाजीनगर – राज्यात उद्या वटपौर्णिमा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी पत्नी आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पुजा करून सात जन्म तोच पती मिळावा अशी प्रार्थना करते. मात्र, या जन्मातच काय पुढच्या सातजन्मी सुद्धा अशी बायको नको, असं म्हणत छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्नीपीडित पुरूषांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली आहे.
पत्नी पीडितांच्या प्रमुख मागण्या
पुरुषांसाठी स्वतंत्र पुरुष आयोग बनवावा.
एकतर्फी कायद्यावर बंदी आणावी.
प्रत्येक पोलिस ठाण्यात पुरुष दक्षता समिती स्थापन करावी.
जिल्हा स्तरावर पुरुष तक्रार निवारण केंद्र देखील स्थापन करावे .
कौटुंबिक वाद माननीय न्यायालयात गेल्यास एका वर्षाच्या आत निकाली काढावे.
संघटनेचे तथा आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. भारत फुलारे, भाऊसाहेब साळुंके, पांडुरंग गांडुळे, सोमनाथ मनाळ, चरणसिंग गुसिंगे, भिकन चंदन, संजय भांड आदींची उपस्थिती होती. दरवर्षी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारता याव्यात यासाठी फुलारे यांनी आश्रमाच्या परिसरात पिंपळाच्या झाडाची लागवड करून ओट्याची व्यवस्था केली आहे.
पुरुषांना कायद्याचे संरक्षण मिळणे गरजेचे
पीडित पुरुषांचे म्हणणे आहे की, दिवसेंदिवस पुरुषांवरील अन्यायात वाढ होत आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी वेगवेगळे कायदे बनवले गेले, परंतु सदर कायदे बनवताना पुरुषांवर अन्याय होऊन ते पीडित होतील याचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे सध्याच्या काळात पुरुष हतबल होऊन पीडित झाले आहेत. त्यामुळे पुरुष सबलीकरण करण्यासाठी तयार करण्यात आलेले एकतर्फी कायदे रद्द होऊन पुरुषांना देखील कायद्याचे संरक्षण मिळणे गरजेचे असल्याचे पीडित पुरुषांचे म्हणणे आहे.
पत्नी संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करतात
एक पुरुष मोठ्या आशा उराशी बाळगून मोठ्या उत्साहाने लग्न करतो, पण लग्न झाल्यावर त्याच्या स्वप्नाचे तुकडे तुकडे होणार हे त्याला माहित नसते. बहुतेक वेळेला लग्न झाल्यावर पतीशी कारण नसताना भांडण करण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय काही बायका पतीचा बुजगावण्यासारखा वापर करतात. लग्नाचा शिक्का मारल्यावर त्यांना नवऱ्याची संपत्ती हवी असते, मात्र त्यांना पती आणि त्याचे नाव नको असते. जर तिला संपत्ती मिळत नसेल तर ती पतीसोबत आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर केस करून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते, असे पीडीत पुरुषांचे मत आहे.