द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात भाव तेजीत राहण्याची अपेक्षा
द्राक्ष उत्पादक शांताराम शिंदे यांचा अंदाज
निफाड, रामभाऊ आवारे – जगाचा अन्नदाता, गोरगरिबांचा मायबाप, जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बळीराजाला दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागत असून दरवर्षी उत्पादन निघण्याच्या वेळेसच भाव पाडले जातात ही शोकांतिका असून शेतकऱ्यांनी शेतीमाल पिकवायचा तरी कधी? अशीच एकंदरीत परिस्थिती झालेली आहे. द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील वनसगाव ,उगाव ,खेडे ,शिवडी, नांदुर्डी, खडक माळेगाव ,सारोळे ,सोनेवाडी आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बारमाही द्राक्ष पिकाचे उत्पादन घेतले जाते. आंबट गोड चवीने परदेशीय परप्रांतीयांना भुरळ घालणाऱ्या परकीय चलन मिळवून देणाऱ्या द्राक्ष पिकाला अवकळा आली की काय ? असे म्हणणे वावगे ठरणार नाही कारण सलग तीन वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याची अवस्था द्राक्ष उत्पादन याची अवस्था तळ्यात मळ्यात अशीच झाली असून द्राक्ष पीक घ्यावे की नाही? अशा द्विधा मनस्थितीत तो सापडला आहे.
यावर्षी हवामानातील लहरीपणाचा द्राक्ष हंगामावर विपरीत परिणाम झाला आहे ,त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना विविध समस्यांचा सामना करावा लागला होता. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादकांचे कंबरडे मोडले होते .त्यातच सातत्याने वाढलेले औषधांचे खर्च, डिझेलची झालेली दरवाढ, वाढलेली मजुरी यामुळे ही द्राक्ष उत्पादक मेटाकुटीस आला होता. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील अति थंडी आणि पावसामुळे बहुतांश द्राक्ष बागांच्या मण्यांना तडे गेले असून उत्पादनात बरीशी घट झाली आहे. तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी हाडाची काडे करून राबराब राबत असतो आणि ऐन पीक काढणीच्या वेळेस भाव पाडले जातात ही शोकांतिका असून या कारणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडत चालला आहे. परराज्यातून द्राक्षाला कमी मागणी असल्याने द्राक्ष उत्पादक संकटात सापडला होता. हे कमी काय होते म्हणून जागतिक स्तरावर रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे द्राक्ष निर्यात मंदावली होती .
आता वाढता उन्हाळा, परराज्यातून होळीनंतर वाढलेली द्राक्ष मागणी यामुळे द्राक्षाला चांगली किंमत मिळण्याची शक्यता वर्तविली जात असली तरीही निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे की काय असे म्हणणे वावगे ठरणार नाही कारण गत चार-पाच दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलाने शेतकरी धास्तावला असून लवकरात लवकर आपला द्राक्ष मालक विकण्याच्या तयारीत आहे परंतु शेतकऱ्यांनी या संकटाला सामोरे जात एप्रिल मध्ये बाजार भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन काळजी घ्यावी. आगामी महिन्यामध्ये उर्वरित द्राक्ष मालाला उत्पादनाच्या खर्चाच्या तुलनेत बाजार भाव मिळावा अशी तमाम द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. द्राक्ष पंढरीतील शेतकरी बाजार भाव मिळण्यासाठी आपल्या बारमाही असलेल्या द्राक्ष पिकाकडे चांगल्या क्वालिटीची द्राक्ष तयार व्हावी यासाठी अमाप खर्च करून बाजार भाव कसा मिळवता येईल यासाठी प्रयत्नशील असतो. आज मितीस तालुक्यातील ५० टक्के द्राक्ष माल विक्री झाला असून अद्यापही धनदांडग्या कडे भरपूर प्रमाणात शिल्लक आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांनी आपला माल विक्री करताना घाई गर्दी न करता अंतिम टप्प्यातील द्राक्ष विक्री करता रोख बाजार भावाने मालविक्री करावा व होणारे संकट टाळून आपले नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी तरच द्राक्ष उत्पादकांच्या पदरात काहीतरी पडेल, अशी अपेक्षा वनसगाव तालुका निफाड येथील उच्च प्रतीची द्राक्ष तयार करणारे द्राक्ष उत्पादक द्राक्ष उत्पादक शांताराम शिंदे यांनी केली आहे.