जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा ,रंगभरण स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
श्री के.बा.विद्यालयाचा अभिनव उपक्रम
सेलू – प्रतिनिधी – ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रा महोत्सवानिमित्त श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या वतीने आज दि 16 सोमवारी जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा व तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धेस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ऍड.अनिरुद्ध जोशी होते.उदघाटक म्हणून मंदिराचे पुजारी वामनराव मंडलिक तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव महेशराव खारकर,संस्थेचे सदस्य जयंतराव दिग्रसकर हे उपस्थित होते.व्यासपीठावर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बालासाहेब हळणे,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके आदींची उपस्थिती होती.
यावेळी श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले आणि विद्यार्थ्यास शुभेच्छा दिल्या.संस्थेचे सदस्य जयंतराव दिग्रसकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावरील परीक्षेत आवर्जून सहभागी झाले पाहिजे.यामुळे परिक्षेबद्दलची भीती दूर होते तसेच व्यक्तिमत्वाला सुद्धा आकार येत असतो.आदर्श विद्यार्थी घडवताना शाळांनी सुद्धा विविध स्पर्धेचे आयोजन केले पाहिजे.श्री के बा विद्यालयाने जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा घेतली ही मुख्य परीक्षेची रंगीत तालीम असल्यासारखे आहे.यामुळे शाळेने तालुक्यात गुणवत्तेचे वातावरण निर्माण केले आहे .रंगभरण स्पर्धेत 170 विद्यार्थ्यांनी तर शिष्यवृत्ती परीक्षेस 145 विद्यार्थी जिल्हाभरातून सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बालासाहेब हळणे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिता जवळेकर तर आभार किशोर खारकर यांनी मानले.शिष्यवृत्ती परीक्षेस सर्व मान्यवरांसह संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.सुनील कुलकर्णी यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.