क्रीडा संकुलात सुविधा उपलब्ध करुन द्या,माणिक पोंढे यांची मागणी
परभणी,दि.22(प्रतिनिधी) : येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानात खेळाडूंची गैरसोय होत असून त्यांना पूरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी मागणी शिवसेनेने जिल्हा क्रिडा अधिकार्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख माणिक पौंढे यांनी सोमवारी (दि.22) जिल्हा क्रिडा अधिकार्यांची भेट घेवून आपल्या मागणी संदर्भात निवेदन सादर केले. त्याद्वारे, परभणी जिल्हा क्रीडा संकुल मैदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खेळाडू सराव करण्यासाठी येतात. परंतु, जिल्हा क्रीडा संकुल मैदानाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. या ठिकाणी सराव करून भवितव्य घडवणे तर दूरच परंतु सरावा दरम्यान खेळाडूंना इजा होण्याची शक्यता अधिक निर्माण झालेली आहे कारण की या मैदानाची अवस्था अत्यंत वाईट आहे. जागोजागी गवत वाढलेले आहे, खड्डे पडलेले आहेत, धावपट्टी तर नाहीच, परंतु धावण्यासाठी सपाट मैदानसुद्धा नाही. याकडे जिल्हा क्रीडा अधिकार्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे व खेळाडूं करिता तात्काळ मैदान दुरुस्ती व स्वच्छता करावी, अशी मागणी पोंढे यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.