प्रबोधनाशिवाय क्रांती होऊ शकत नाही- प्रा. गंगाधर बनबरे यांचे प्रतिपादन
परभणी,दि 28 ः
” महापुरूषाच्या विचारांचे धन सांभाळून ठेवले पाहिजे. कारण कोणत्याही क्रांतीची सुरूवात प्रबोधनाने होत असते. समाजाचे प्रबोधन करण्यासाठी महापुरूषांचे विचार जतन करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकर यांच्या प्रगल्भ विचाराने व कार्याने मानवी व्यापकता वाढली आहे. म्हणून या महापुरूषांचे विचार हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आहेत.” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विचावंत गंगाधर बनबरे यांनी मराठा सेवा संघ आयोजित महामानवांना अभिवादन सोहळ्यात व्याख्यानानिमित्त व्यक्त केले.
मराठा सेवा संघ शाखा परभणीच्या वतीने महामानवांना अभिवादन सोहळ्यानिमित्त दोन दिवशीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी समारोपीय व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषिभुषण सोपानकाका अवचार हे होते. यावेळी मंचावर व्याख्याते गंगाधर बनबरे , प्रमुख पाहुणे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर , लोकनेते विजय वाकोडे , मराठा सेवा संघाचे लक्ष्मणराव तारे ,प्रा. दिलीपराव मोरे , जिजाऊ संस्थानचे प्रा. रूस्तूमराव भालेराव , मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव भुसारे आदी उपस्थित होते.
गंगाधर बनबरे बोलताना पुढे म्हणाले की, ” महापुरूष हे कोणत्याही जातीचे नसतात ते राष्ट्राचे असतात. परंतु आपण स्वार्थी राजकारणासाठी महापुरूषांची जातीजातीत विभागणी करून त्यांना लहान करत आहोत. परंतु त्यांचे विचार हे देशाला व सकल मानव जातीच्या उन्नतीसाठीचेच आहेत. गौतम बुध्द, छत्रपती शिवराय , महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची विचारधारा एक असून ती मानव जातीच्या कल्याणाची आहे. म्हणून या सर्व महामानवांना एकत्रित अभिवादन करून मराठा सेवा संघाने नवा आदर्श उभा केला आहे. कारण हे सर्व महापुरूषांचे विचारांचे व कार्यांचे नाते एकमेकांनी बांधले गेलेले आहे. म्हणून आपण त्यांच्या विचारांचे वारस म्हणून हे विचार पुढे नेले पाहिजे. ”
अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की, मराठा सेवा संघ हि एक सामाजिक बांधिलकी जपणारी संघटना असून सर्व महापुरूषांच्या विचारांना लोकांच्या मनात रूजवण्याचे स्तृत्य काम या व्याख्यानमालेच्या माध्यमातून केले जात आहे. हे अभिनंदनीय आहे.”
अध्यक्षीय समारोपात कृषिभूषण सोपान अवचार म्हणाले की, ” मराठा सेवा संघच्या माध्यमातून सातत्याने समाज हिताचे उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे समाजातील विघातक प्रवृत्तीला आळा बसत आहे. वैचारिक जागृती घडवणारी चळवळ म्हणून या संघटने कडे पाहिले जाते.”
मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल भुसारे यानी प्रास्ताविकात मराठा सेवा संघाची भुमिका विषद केली. मराठा सेवा संघ समाजात सामाजिक स्वास्थ्य निर्माण करण्यात सातत्याने कठिबद्ध असेल अशी भुमिका मांडली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सखाराम रणेर यांनी तर आभार कार्याध्यक्ष सुनिल जाधव यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव सुधाकर गायकवाड, प्रवक्ते सुभाष ढगे, उपाध्यक्ष तुळशीराम दळवी, कोषाध्यक्ष सुभाष जाधव , बाळासाहेब यादव , कार्याध्यक्ष नरहरी वाघ ,बाळासाहेब जाधव, सुशिल देशमुख, मिलींद देशमुख, ज्ञानेश्वर खटींग,सचिन गरूड, शरद जावळे,रवी लोहट , शाम गाडेकर , बालाजी मोहिते , शिवमती कांचनताई कारेगावकर मीनाक्षी पाटील , भगवान दुधाटे आदीनी प्रयत्न केले.