साहेब बडव्यांना बाजूला करा आणि… छगन भुजबळ यांच्या भाषणातील बडवा कोण?

0 414

 

मुंबई – आज राष्ट्रवादीतील दोन्ही गटाच्या बैठका होत आहे. अजित पवार गटाच्या या बैठकीत सर्वात आधी छगन भुजबळ यांचे भाषण झाले. यावेळी छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यासह त्यांच्या गटाच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. शरद पवार आमचे विठ्ठल आहेत. पण त्यांना पक्षातील काही बडव्यांनी घेरलं आहे. साहेब, या बडव्यांना दूर करा. आम्हाला आवाज द्या. आम्ही तुमच्यासोबत येतो. आपण सरकारमध्ये राहून महाराष्ट्राच्या विकासाचं काम करू, असं आवाहनच छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना केलं. तसेच पवार यांना बडव्यांनी घेरल्याचं सांगत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे पवारांना घेरणारे ते बडवे कोण? असा सवाल केला जात आहे.

 

आताची ही परिस्थिती पाहून साहेबांना वाईट वाटणं साहजीकच आहे, त्यांच्याबद्दल आमच्या मनात प्रेम आहे. पण साहेब आपण वसंतदादांना सोडलं, त्यांनाही असंच वाईट वाटलं. बाळासाहेबांनाही मी सोडलं, तुम्ही सांगितलं नाही तिकडे थांबा म्हणून. बाळासाहेब आणि मांसाहेबांनाही असंच वाईट वाटलं. इतकंच नव्हे तर धनंजय मुंडेंनाही इकडे घेतलं. त्यावेळी काका असलेले गोपिनाथ मुंडे आणि बहिण असलेली पंकजा यांच्या डोळ्यातही असेच अश्रू आले. या सगळ्याची पुनरावृत्ती व्हायला आली.

 

साहेब अजूनही काही बिघडलेले नाही. तुम्ही तुमच्याभोवतीच्या बडव्यांना बाजूला करा आम्ही सगळे तुमच्याकडे परत येऊ. तुम्ही नागालँडमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांना भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची परवानगी दिली, त्यांचा सत्कार केला. मग आमचाही सत्कार करा, आपण एकत्र सत्तेत बसू, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

error: Content is protected !!