सेलूत “वीर महिला सौ गीताबाई चारठाणकर ” पुरस्काराचे वितरण
मान्यवरांची उपस्थितीत १६ जून ला होणार वितरण सोहळा
सेलू (नारायण पाटील)
येथील महिला मंडळाच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जाणारा २०२३ या वर्षासाठीचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘वीर महिला सौ. गीताबाई चारठाणकर पुरस्कार’ ज्येष्ठ सिने-नाट्य व दूरदर्शन कलावंत चिन्मयी सुमित यांना जाहीर करण्यात आला आहे.
महिला मंडळ व पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा विजया कोठेकर यांनी शुक्रवारी, २६ मे रोजी ही माहिती दिली. या वेळी सचिव ललिता गिल्डा, वर्षा डोंग्रजकर, डॉ. राजाभाऊ चारठाणकर, वामनराव वाईकर, बाबासाहेब चारठाणकर, वरुणा चारठाणकर, रजनी सुभेदार आदी पुरस्कार निवड समितीचे सदस्य उपस्थित होते.
स्वातंत्र्य सैनिक गीताबाई चारठाणकर यांच्या स्मृती निरंतर जागृत राहाव्यात व त्यांच्या कार्याची प्रेरणा इतरांनी घ्यावी, या उद्देशाने मराठवाडा पातळीवर शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात बहुमोल कार्य करणाऱ्या एका भगिनीला दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. पुरस्काराचे हे २९ वे वर्ष आहे. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गीताबाई चारठाणकर यांच्या स्मृतिदिनी १६ जून रोजी चिन्मयी सुमित यांना समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजिका नंदिनी नरेंद्र चपळगावकर, तर प्रमुख अतिथी म्हणून माजलगाव येथील सिध्देश्वर महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त उपप्राचार्य स्नेहल पाठक उपस्थित राहणार आहेत.
या वेळी ‘ महिलांची सुरक्षितता : काळाची गरज’ या विषयावर स्नेहल पाठक या मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करुणा कुलकर्णी, शुभदा चारठाणकर, वरुणा कुलकर्णी रोहिणी कुलकर्णी, वसुधा खारकर, भाग्यश्री धामणगावकर व संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.