संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य, ”मी परत एकदा दावा करतो की महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री मिळतील कारण…”
मुंबई – महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे सरकारचा खेळ आता औटघटकेचा आहे. कारण बहुमतासाठी 170 चा आकडा असतानाही भाजपने राष्ट्रवादीच्या 40 जणांचा गट नव्याने सरकारमध्ये सामील केला आहे. याचा अर्थ असा आहे की, तुमची गरज संपली. आता तुम्ही गाशा गुंडाळा, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले की, सरकारमध्ये सामील होताच अजित पवारांच्या 9 मंत्र्यांना तातडीने शपथ दिली जाते. पण, मंत्रिपदासाठी वर्षभरापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शिंदे गटाच्या नेत्यांना शपथ दिली जात नाही. याचाच अर्थ शिंदे गटाची गरज आता संपली आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अवस्था तर अतिशय केविलवाणी झाली आहे.
संजय राऊत म्हणाले की, ना घर का घाट का अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अवस्था आहे. लवकरच महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळतील. पण ही परिस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:हून ओढवून घेतलेली आहे. स्वाभिमान असेल आणि जुनी वक्तव्य आठवत असतील, तर छगन बुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. त्यांनी बाळासाहेबांना अटक केली, अजित पवार यांच्यामुळे आम्ही पक्ष सोडला म्हणणाऱ्यांनी आता राजीनामे द्यावे. कारण मांडीला मांडी लावून नाही तर ते आता तुमच्या मांडीवरच येऊन बसलेत.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद धोक्यात आहे असं म्हटलं होतं. त्यांच्या याच वाक्याचा त्यांनी पुन्हा पुनरूच्चार केला आहे. ते म्हणाले की, “अजित पवार गटातील ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. पण शिंदे गटाच्या बाशिंग बांधून बसलेल्या लोकांना शपथ दिली जात नाही. मी परत एकदा दावा करतो की महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री मिळतील हे नक्की.”