सेलू शहरावर तीव्र पाणी टंचाईचे सावट.. कारण आले समोर

0 372

सेलू (नारायण पाटील )
परभणी व जालना जिल्ह्यातील तीन शहरासह ग्रामीण भागातील शेकडो गावांची तहान भागविणा-या निम्न दुधनेत सद्यस्थितीत जेमतेम पाणी साठा असून जून पासून मार्च महिन्या पर्यंत प्रकल्पातील तब्बल ४५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. त्यातच उन्हाचा पारा वाढत असून एप्रिल व मे महिन्यात आणखी वेगाने पाण्याचे बाष्पीभवन होणार आहे.
सध्या धरणात केवळ ६.४०% जिवंत पाणी साठा असून सेलू शहरावर तीव्र पाणीटंचाईचे सावट दिसून येत आहे .
जालना जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर निम्न दुधना प्रकल्पात वेगाने पाणी साठा होतो. यंदा अत्यल्प पाऊस झाल्यानंतर प्रकल्पात पावसाळ्यातील चार महिन्यात केवळ २७ दलघमी पाण्याची वाढ झाली होती. सन २०२२ साली सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यानंतर प्रकल्पात वेगाने पाणी साठा झाला होता. परंतु प्रकल्पात शंभर टक्के जलसाठा केल्यानंतर बुडीत क्षेत्रात गेलेल्या असंपादित जमीनीवर पाणी साचून पिकांचे नुकसान होत असल्याने परतूर व मंठा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन करून असंपादीत जमीनी संपादित करे पर्यंत प्रकल्पात शंभर टक्के जल साठा करण्यास विरोध केला होता. त्यानंतर जलसंपदा विभागाकडून प्रकल्पात केवळ ७५ टक्केच पाणी साठा ठेवून उर्वरित पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. प्रकल्पात २०२२ ऑक्टोबर अखेरी पर्यंत ७५ टक्के पाणी होते. त्यानंतर रब्बी हंगामातील पिकांना दोन्ही कालव्यातून चार पाणी आवर्तन सोडण्यात आले. तसेच उन्हाळी पिकांना दोन पाणी पाळया सोडण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रकल्पात २५ टक्के जलसाठा शिल्लक होता. पावसाळयाच्या चार महिन्यात जेमतेम पाऊस पडला. त्यामुळे प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. पुर्ण पावसाळ्यात केवळ २७ टक्केच पाणी पातळीत वाढ झाली होती. परिणामी या वर्षी कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांना पाणी सोडण्यात आले नाही. तीन वर्षानंतर यावर्षी प्रथमच प्रकल्पाने निच्चांकी पाणी पातळी गाठली आहे. निम्न दुधना प्रकल्पातून सेलू शहर, जालना जिल्ह्यातील परतुर व मंठा शहरासह वाॅटर ग्रीड योजनेतील शेकडो गावाना पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे प्रकल्पातील पाणी पातळी कमी झाली आहे. त्यातच जून महिन्या पासून प्रकल्पातील ४५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. जून ते डिसेंबर महिन्या पर्यंत बाष्पीभवनाचा वेग मर्यादित होता. त्यानंतर जानेवारी पासून तापमानात हळू हळू वाढ होत असून बाष्पीभवनाचा वेग वाढत आहे.

निम्न दुधना प्रकल्पातील पाणी साठयाचे प्रत्येक महिन्याला सरासरी ५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असून एप्रिल व मे महिन्यात तापमानात आणखी वाढ होणार असल्याने बाष्पीभवनाचा वेग देखील वाढणार आहे . सद्यस्थितीत प्रकल्पात केवळ ६.२७ टक्केच जिवंत पाणी साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी या दिवशी हा जिवंत पाणी साठा ४३.१७% होता .त्यामुळे सेलू शहराला भविष्यात भयावह अशा पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे .दर वर्षी धरणातून पुरेसा पाणी साठा उपलब्ध होत असल्याने शहरातील बहुतांशी हापसे देखील बंद अवस्थेत आहेत .त्यामुळे पाणीटंचाई झाली तर शहराला पाणी टँकर शिवाय पर्यायच राहणार नाही .सदरील येणाऱ्या परिस्थितीचा नागरिकांनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ असून पाण्याचा होणार अपव्यव टाळणे अत्यंत गरजेचे आहे .

error: Content is protected !!