शिवसेनेचा फायरब्रँड नेताही फुटला, ‘शिंदेशाही’ गटात आणखी एक कॅबिनेट मंत्री
मुंबई,दि 22 ः
जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेला मोठं खिंडार पडल्याचं चित्र आहे. कारण सर्व आमदारांसह मंत्रीही फुटल्याचा दावा केला जात आहे. आमदारांच्या पाठोपाठ मंत्री गुलाबराव पाटील हेसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यात आता जळगाव जिल्ह्यातील अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे दोघेही गुवाहाटीकडे रवाना झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे खाजगी विमानाने जळगाव विमानतळावरुन रवाना झाले आहेत. तर मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा मुंबईहून परस्पर गुवाहाटीकडे रवाना झाल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्व आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या वाटेवर असून जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.
यापूर्वी जळगाव जिल्ह्यातील तीन आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. तर दुसरीकडे आता मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा त्याच वाटेवर गेले असल्याची चर्चा आहे.
जळगाव जिल्ह्यातील शिवसेना पक्षाची सध्याची स्थिती बघितली तर तर शिवसेनेचे जिल्ह्यात एकूण चार आमदार आहेत. यात पारोळा येथील चिमणराव पाटील, पाचोर्याचे किशोर पाटील पाटील, चोपडा मतदारसंघाच्या लताबाई सोनवणे आणि धरणगावचे गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे. यात गुलाबराव पाटील हे सद्यस्थितीत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आहेत. तर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले आमदार चंद्रकांत पाटील हे शिवसेनेसोबत होते.
रात्रभरातील घडामोडीनंतर गुलाबराव ‘शिंदे’ गोटात
काल मुबंईत शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित राहणारे गुलाबराव पाटील यांनी अचानक सकाळी एकनाथ शिंदे यांच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतला. रात्रभर भाजपाचे नेते गिरीश महाजन गुलाबरावांच्या संपर्कात असल्याचे सांगीतले जात आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी गुलाबराव पाटलांशी संपर्क करुन त्यांना गळ घातली. रात्रभर झालेल्या या घडामोडीनंतर शिवसेनेची मुलुख मैदान तोफ अखेर ‘शिंदे’ गटात दाखल झाली आहे.
सध्याच्या स्थितीत जिल्ह्यातील सर्व आमदार व मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाटेवर असल्याने जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. नेमका आगामी काळात करतात याकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.