किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन,ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षिदार व्हा – छगन शेरे यांचे आवाहन
सेलू,दि 29 ः
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही दुर्गराज रायगडावर ५ व ६ जून २०२२ रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होत आहे. यंदा “धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची” ‘जागर शिवशाहीरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा सोहळा पालखीचा’ हे कार्यक्रम शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आकर्षण बिंदू असणार आहेत. अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष तथा सोहळा समितीचे सदस्य छगन शेरे यांनी दिली.
युगपुरुष छत्रपती शिवरायांनी सुमारे साडे तीनशे वर्षांपूर्वी लोकशाहीच्या तत्त्वावर स्वराज्याची उभारणी केली. अठरा अलुतेदार बारा बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्यात ऐक्य घडवले. शत्रुवर जरब बसवत रयतेला स्वाभिमानाने जगण्याचा मंत्र दिला. छत्रपती शिवरायांचा ६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याला छत्रपती मिळाले. महाराष्ट्रासह देशभरात ही घटना इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद घेणारी ठरली. हा दिवस म्हणजे ख-या अर्थाने भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन तो राष्ट्रीय सण’ म्हणून साजरा होण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती कार्यरत आहे. असे शेरे यांनी सुतोवाच केले. राज्याभिषेकाकाच्या स्मुती चिरंतन राहाव्यात, यासाठी समितीतर्फे दरवर्षी दुर्गराज रायगडावर राज्याभिषेकाचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. यंदाही हा सोहळा ५ व ६ जूनला विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे.
छत्रपती शिवराय व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे किल्ले रायगडावर हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. देशभरातून इतिहास संशोधक, अभ्यासक, शिवभक्त, इतिहास प्रेमी या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
त्याचबरोबर ६ जूनला मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक झाल्यानंतर “सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा” या पालखी मिरवणुकीत महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, अठरा अलुतेदारासह सर्व धर्मातील लोक सहभागी होणार आहेत. आपआपल्या पारंपरिक लोककलांचा मिरवणुकीत जागर घालणार आहेत. राजसदर,नगारखाना बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर असा पालखी सोहळ्याचा मार्ग असेल. या मार्गावरून पालखीवर पुष्पवृष्टी केली जाणार असल्याची माहिती छगन शेरे यांनी यावेळी दिली. सर्व शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे सदस्य छगन शेरे यांनी केले आहे.