श्रीगणेश चतुर्थी…

0 119

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ॥
श्री गणेशाच्या या ध्यानमंत्रामध्ये त्याच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन आहे. गणपति हे श्री गणेशाचे एक नाव आहे. ‘गणपति’ हा शब्द ‘गण’ आणि ‘पति’ या दोन शब्दांनी बनला आहे. ‘गण’ याचा अर्थ पवित्रक. ‘पति’ म्हणजे पालन करणारा. गणपति सूक्ष्मातीसूक्ष्म चैतन्यकणांचा म्हणजे पवित्रकांचा स्वामी आहे.
श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. आज पासुन या उत्सवाला सुरुवात होत आहे.
गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा शिवा असेही म्हटले जाते.
विनायक चतुर्थी म्हणून ओळखला जाणारा गणेश चतुर्थी हा भारतातील एक अतिशय भव्य हिंदू सण मोठ्या व सामाजिक स्थरावर साजरा केला जातो. गणेश चतुर्थी म्हणजे उत्सव आणि पूजा तसेच उत्साह आणि भक्तीचा समन्वय आहे. बुद्धीची देवता, 64 कलांचा अधिपती आणि गणांचा ईश गणपती या दिवशी आपल्या भक्तांच्या भेटीसाठी येतो आणि मग पुढे एक, दीड, तीन, पाच, सात, दहा, अकरा, एकवीस अशा ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे वास्तव्य करुन मग आपल्या आवडत्या भक्तांचा निरोप घेतो, अशा सुंदर स्वरुपाचा हा सण आहे.
सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा, असाच सर्व गणेशभक्तांचा प्रयत्न असतो.
गेल्या वर्षी प्रमाणे यंदा कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक स्तरावर हा सण फार धामधुमीत साजरा होणार नाही मात्र यामुळे निराश न होता गणेश भक्त घरोघरी उत्साहाने व भक्तीपूर्वक त्याच्या आगमनाची तयारी करत आहेत. घराघरात गणपती बाप्पाचे आगमन अगदी जोशात, जल्लोषात, उत्साहात आणि आनंदात होईल, यात शंका नाही.
अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व आहे. दर महिन्याच्या चतुर्थीला गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर 100 पटीने कार्यरत असते, तर गणेशोत्सवामधील दीड दिवसांत ते 1000 पटीहून अधिक कार्यरत असते. गणपती या देवतेची लोकप्रियता जगभरात आढळते. भारतासोबतच विदेशातही गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव साजरा केला जातो. भारतातून गणपतीच्या मुर्त्या विदेशात पाठवल्या जातात. तिथे त्यांची प्रतिष्ठापना करून गणेश चतुर्थी पारंपारिकरित्या उत्साहात साजरी केली जाते.
गणेश जन्माची आख्यायिका –
पार्वती देवीला स्नानासाठी जावयाचे होते. पण आसपास लक्ष ठेवण्याकरता कोणीच नव्हते. तेव्हा पार्वती देवीने आपल्या अंगावरील मळाने एक मूर्ती बनवली आणि ती जिवंत केली. या मूर्तीला पहारेकरी नेमलं आणि सांगितलं की, कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस. असे सांगून पार्वतीमाता स्नानासाठी आत गेली. भगवान शंकर काही वेळाने तिथे आले आणि ते आत जाऊ लागले. तोच त्या पहारेकर्‍याने त्यांना अडवले. त्यावर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्या पहारेकर्‍याचं शिर धडावेगळं केलं. पार्वतीदेवी जेव्हा स्नान करून बाहेर आली तेव्हा त्यांनी हा प्रकार पाहिला आणि त्या संतापल्या. ते धडावेगळं शिर पाहून तिने पूर्ण ब्रम्हांड हादरवून सोडलं. सर्व देव अगदी ब्रम्हदेवापासून सगळे देव पार्वतीची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात. पण पार्वती कोणाचं काहीही ऐकून घेत नाही. तेव्हा शंकर देव आपल्या गणाला आदेश देतात की, पृथ्वीतलावर जाऊन सर्वात आधी जो प्राणी दिसेल त्याचं शिर कापून घेऊन ये. गण बाहेर पडल्यावर सर्वात आधी त्याला हत्ती दिसला. तो त्याचं शिर घेऊन आला. भगवान शंकरांनी ते शिर पुतळ्याला लावले आणि त्या मूर्तीला जिवंत केले. हा पार्वतीचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) म्हणजेच गजानन होय. शंकर देवाने त्याला गणाचा ईश म्हणेज देव म्हणून गणेश नाव ठेवलं. हा दिवस चतुर्थीचा होता. त्यामुळे चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी विविध रूपात गणेशाची पूजा केली जाते. या मूर्ती तयार करणे ही एक अद्वितीय अशी कला आहे ज्यातून निराकारापर्यंत पोहोचता येते. गणेश स्तोत्रातही गणेशाच्या स्तुतीपर वर्णनात हेच सांगितले आहे. आपण आपल्या चेतनेतील श्री गणेशाची प्रार्थना करतो की त्याने आपल्यासमोर मूर्तीच्या रूपात यावे जेणे करुन आपण काही काळ त्याच्याशी रममाण होऊ शकू, हसत खेळत संवाद साधू शकू. ठराविक दिवसांनंतर त्यांची प्रार्थना करतो की ते जिथून आले तिथे म्हणजे आपल्या चेतनेत त्यांनी निघून जावे. आपण गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा करतो म्हणजे त्याच्याकडूनच मिळालेल्या गोष्टी आपण त्यालाच अर्पण करत असतो.
पूजा विधी-
पूजेत शक्यतो डाव्या सोंडेचा गणपति ठेवावा. ‘उजव्या सोंडेचा गणपती हा अतिशय शक्तीशाली आणि जागृत आहे’, असे म्हटले जाते. पूजेत उजव्या सोंडेचा गणपती असल्यास कर्मकांडातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून दैनंदिन पूजाविधी पार पाडावे लागतात. डाव्या सोंडेचा गणपती तारक स्वरूपाचा आणि अध्यात्माला पूरक असतो. याची पूजा नेहमीच्या पद्धतीने केली जाते.
श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतांना पार्थिव मुर्तीचे आवाहन, पुजन, अभिषेक, अत्तर फुलं दुर्वा पत्री अर्पण करून अखेर नैवेद्य आणि आरती अशी प्रथा आहे. भगवान गणेशाला दुर्वा प्रिय असल्याने त्यांच्या शिरावर वाहाण्याची प्रथा आहे. आणि गणपतीला आवडणारी लाल फुलं, तांबडे वस्त्र, रक्तचंदन ही वापरतात.
गणपतीचे वाहन उंदीर आहे.
त्याचप्रमाणे नैवैद्यात मोदक अतिप्रीय असल्याने गणेशाला मोदकांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. या दिवशी घरोघरी उकडीचे मोदकांचा नैवेद्य दाखवतात.
गणपती बसल्यनंतर पाच दिवसांनी गौरींचे आगमन होते. त्या दोन दिवस राहतात. सातव्या दिवशी त्यांचेही विसर्जन केले जाते. सार्वजनिक मंडळे या काळात आकर्षक देखावे उभारतात.
भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी 1894 साली केली. या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात.
आदिशंकराचार्यांनी या देवतेचा अर्थ फार सुंदर रितीने सांगितला आहे. श्रीगणेश जरी गजमुख म्हणून माहित असला तरी तो परब्रह्माचे रूप आहे. गणेशाचे वर्णन ‘अजम्, निर्विकल्पं, निराकार रूपम्’ असे केले जाते. तो अजम् आहे म्हणजेच ज्याचा जन्म झाला नाही असा, तो निराकार आहे म्हणजेच आकार रहित आहे आणि निर्विकल्प म्हणजेच विकल्प नसलेला असा आहे. तो सर्वत्र असलेल्या चेतनेचे प्रतिक आहे. प्रत्येक निराकार गोष्ट साकार रूप घेऊ शकत नाही हे आपल्या प्राचीन ऋषी मुनींना माहित होते. सामान्य जनतेला हे समजावे म्हणून त्यांनी त्या निराकार श्रीगणेशाला साकार रूप दिले. बराच काळ साकार रूपाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांना निराकाराचा अनुभव येऊ लागतो.
अशाप्रकारे मूर्तीची स्थापना करून प्रेमाने पूजा करण्याने आणि त्याचे ध्यान करण्याने आपल्याला आपल्यात गणेशाचा अनुभव घेता येतो. आपल्यातील गणेश तत्वाला जागृत करणे हीच गणेश चतुर्थी मागची खरी भावना आहे.
असे मानले जाते की घरात गणपती आणल्याने ते घरातील सर्व अडथळे दूर करतात. गणेशोत्सव विशेषतः महाराष्ट्रात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील गणेशोत्सव पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपर्‍यातून गणपतीचे भक्त महाराष्ट्रात येतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे मोठ्या थाटामाटात विसर्जन केले जाते.
गणपती बाप्पाच्या आगमनाने घरात सकारात्मकतेचा संचार होतो. प्रत्येक जण आपापल्या परिने गणपतीचे नामस्मरण, उपासना, आराधना करत असतो. मन खंबीर करण्याची, संतोषी वृत्ती ठेवण्याची आणि सर्वांना एकत्र आणण्यासाठी एखादं निमित्तमात्र कारणही निर्माण करून त्यातून सामाजिक आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी, बंधुभाव निर्माण करणारा गणेशोत्सव खूप महत्त्वाचा वाटतो.
मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला,
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले,
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे
ज्योती कुलकर्णी, मुंबई
लेखिका, स्पेशल एजुकेटर व समाजसेविका

error: Content is protected !!