श्री शिवाजी महाविद्यालयाने फहिमच्या पंखांना दिले बळ,कृत्रिम पाय बसविण्यासाठी केली आर्थिक मदत
परभणी,दि 13 (प्रतिनिधी)ः
नेहमीच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाने पदव्युत्तर वर्गात शिकणाऱ्या बेग फहीम बेग नजीर या एका पायाने दिव्यांग असलेल्या विद्यार्थीस कृत्रिम पाय बसविण्यासाठी ४७ हजाराची मदत करून त्यास दोन्ही पायाने चालण्यासाठी बळ दिले आहे.
अधिक माहिती अशी की शहरातील शंकरनगर मधील रहिवासी असलेला बेग फहिमचा वयाच्या दहाव्या वर्षी झालेल्या अपघातात एका पायाने दिव्यांग झाला. अशा वेळी तो न डगमगता आत्मविश्वासाने शिक्षण घेत राहिला. शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयात रोज घर ते महाविद्यालय असा प्रवास केवळ एका पायाने करत आहे. या गोष्टीची चाहूल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांना लागली. त्यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यांना मदतीची हाक दिली. बघता बघता दोन तासात त्याच्या कृत्रिम पायासाठी लागणारी ४७ हजाराची रक्कम जमा झाली. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असलेला फहिम आता दोन्ही पायावर चालू शकणार आहे. तो नांदेड येथील खाजगी रुग्णालयात हा कृत्रिम पाय बसविण्यासाठी जात असल्याचे सांगितले. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेत जाण्याचा विचार त्याने यावेळी व्यक्त केला. शिक्षणाविषयी असलेली जिद्द पाहून तो महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचा प्रिय विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आले.
फहिमला आर्थिक मदत देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्या डॉ.विजया नांदापूरकर, डॉ.जयप्रकाश गायकवाड, प्रा.रविशंकर झिंगरे, डॉ.सलीम मोहियोद्दीन, डॉ.प्रशांत सराफ, प्रा.संतोष कोकीळ, डॉ.सुरेंद्र येनोरकर, डॉ.प्रल्हाद भोपे, डॉ.राजू बडूरे आदींची उपस्थिती होती.
महाविद्यालयाच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
: श्री शिवाजी महाविद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी फहिम बेग यास कृत्रिम पाय बसविण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वतीने आर्थिक मदत देताना प्राचार्य डॉ बाळासाहेब जाधव, डॉ.श्रीनिवास केशट्टी, डॉ.विजया नांदापूरकर, डॉ.जयप्रकाश गायकवाड समवेत अन्य कर्मचारी दिसत आहेत.