… तर मुख्यमंत्र्यांना आषाढी महापूजेसाठी पाऊल ठेवू देणार नाही, धनगर समाज आक्रमक

0 39

उजनीचे पाणी  बारामती लोकसभा मतदारसंघात नेण्यात आले असून याला मंजुरी जलसंपदा मंत्र्यांनी दिली तर निधी अजित पवार यांनी दिला. मात्र या उजनीच्या पाण्यावरून धनगर समाजाचे असलेले आणि राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांना टार्गेट करून त्यांना हटवण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे, असा आरोप धनगर समाजानं केला आहे. जर भरणे यांना पालकमंत्री पदावरून हटविले तर याची किंमत राष्ट्रवादीला चुकवावी लागणार असून आषाढी पूजेला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये पाऊल ठेऊ देणार नसल्याचा इशारा धनगर समाजाने दिला आहे. पंढरपूर येथे झालेल्या धनगर समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

उजनीच्या पाण्यावरून सुरु झालेला वाद आता चांगलाच पेटू लागला असून यात आता जातीचे राजकारण देखील होऊ लागले आहे. उजनीचे पाणी बारामती आणि इंदापूरला पळविल्याचा आरोप करत सोलापूर जिल्ह्यातून तीव्र संघर्षाला सुरुवात झाली आहे. यातच काही राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री भरणे यांना जबाबदार धरून त्यांना हटवण्याचा उद्योग करत असल्याचा आरोप धनगर समाजाने केला आहे.

उजनीच्या पाण्यावरून सोलापुरात राजकारण तापले असून पालकमंत्री दत्तात्रय भरणे हटाव अशी भूमिका काँगेस, भाजपमधून सुरु असताना त्यात राष्ट्रवादी काँग्रेस ही कुरघोड्या करत असल्याचा आरोप धनगर समाजाने पंढरपूरमध्ये पार पडलेल्या बैठकीत केला आहे.

महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतके धनगर समाजातील आमदार असून त्यांना राजकारणातून बाहेर काढण्याचा हा कुटील डाव असल्याचा आरोप यावेळी धनगर नेत्यांकडून करण्यात आला.  जर का दत्तात्रय भरणे यांना सोलापूर पालकमंत्री पदावरून जर हटवले, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी वारीला महापूजेला पंढरपूरमध्ये येऊ देणार नाही, असा पवित्रा धनगर समाज संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या नावाने घोषणाबाजी देखील करण्यात आली.

error: Content is protected !!