जडेजाच्या १७५ नाबाद खेळीनंतर श्रीलंका १०८/४
मुंबई, गुरुदत्त वाकदेकर – मोहाली येथील आयएस बिंद्रा स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसर्या दिवशी सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खेळ संपला तेव्हा श्रीलंकेची धावसंख्या १०८/४ होती आणि भारत ४६६ धावांनी आघाडीवर होता. भारताकडून रविचंद्रन अश्विनने दोन तर रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, रवींद्र जडेजाने नाबाद १७५ धावा केल्याने भारताने पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला. ही जडेजाची कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या होती. ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या भारतीय खेळाडूची ही सर्वोच्च धावसंख्या होती.
काल विराट कोहली आपल्या कारकिर्दीची १०० वी कसोटी खेळत असताना वैयक्तिक ४५ धावांवर बाद झाला होता. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने ६ बाद ३५७ धावा केल्या होत्या. हनुमा विहारीने ५८ धावांची खेळी केल्यानंतर ऋषभ पंतने केवळ ९७ चेंडूत ९६ धावा केल्या.
रवींद्र जडेजाने मोहाली कसोटीच्या पहिल्याच डावात श्रीलंकेच्या गोलंदाजांना आपल्यासमोर लोटांगण घालायला भाग पाडले. जडेजाच्या नाबाद १७५ धावांच्या जोरावर भारताने आपला पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला आहे. जडेजाची ही १७५ धावांची कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी ठरली. विराट कोहलीच्या १०० व्या कसोटी निमित्त जणू रविंद्र जडेजाने त्याला ही खास भेट दिली.
दरम्यान, या सामन्यात रविंद्र जडेजाच्या नावावर एक नवा विक्रम झाला आहे. जडेजाने भारताचे माजी खेळाडू कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे. रविंद्र जडेजा हा सातव्या क्रमांकावर खेळायला आला होता. यापूर्वी सातव्या क्रमांकावर खेळायला येऊन सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा कपिल देव यांच्या नावावर होता. कपिल देव यांनी सातव्या क्रमांकावर खेळायला येऊन १७० धावांची खेळी केली होती. पण आज रविंद्र जडेजाने १७५ धावांची दमदार खेळी करत कपिल देव यांजचा विक्रम मोडला आहे. या सामन्यात रविंद्र जडेजाच्या नावावर एका नवीन विक्रमाची नोंद झाली आहे.
जडेजा आणि अश्विन यांनी भारताला दुसऱ्या दिवशी दणदणीत सुरुवात करून दिली. सुरुवातीला जडेजाने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. जडेजापाठोपाठ अश्विननेही श्रीलंकेच्या गोलंदाजीवर आक्रमण केले आणि भारतासाठी धावांची लूट केल्याचे पाहायला मिळाले. जडेजाने आपले अर्धशतक साकारले, पण अश्विनही यावेळी धावा जमवण्यात मागे नव्हता. जडेजापाठोपाठ अश्विननेही यावेळी आपले अर्धशतक पूर्ण केले. जडेजा आणि अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी १३० धावांची दमदार भागीदारी रचली. ही जोडी आता भारताला अजून मोठी धावसंख्या उभारून देईल, असे वाटत होते. पण जेवणाच्या काही मिनिटांपूर्वीच अश्विन बाद झाला आणि ही जोडी फुटली. अश्विनने यावेळी आठ चौकारांच्या जोरावर ६१ धावांची खेळी साकारली. त्यानंतर जेवणाला जाण्यापूर्वी जडेजाने दिमाखात आपले अर्धशतक साजरे केले.
जडेजा जेवणानंतर कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. अश्विनसारखीच जयंत यादव आता जडेजाला कशी साथ देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण जयंत यादव यावेळी फक्त दोन धावांवर बाद झाला आणि भारताला आठवा धक्का बसला. जयंत बाद झाला असला तरी जडेजा डगमगला नाही. जडेजाने आपली दणकेबाज फलंदाजी सुरुच ठेवली होती. जडेजाला यावेळी मोहम्मद शमी चांगली साथ देत होता. जडेजाने यावेळी आपले दमदार अर्धशतक साजरे केले. त्यामुळे जडेजा आता द्विशतक झळकावणार का, अशी चर्चा सुरु झाली होती. पण जडेजा १७५ धावांवर खेळत असताना भारतीय संघाने पहिला डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला आणि जडेजाच्या चाहत्यांची खूप मोठी निराशा झाली. शमीने यावेळी तीन चौकारांसह नाबाद २० धावा केल्या होत्या.