एसटी चालक पतीला सुट्टी मिळेना;आंदोलक पत्नी गुन्हा दाखल
सांगली,दि 14 ः
एसटी चालक पतीला सुट्टी दिली नाही म्हणून पत्नीने सांगलीच्या आटपाडी येथील एसटी आगार प्रमुखांच्या केबिनसमोर झोपून आंदोलन केलं. यानंतर संबंधित महिलेवर एसटी आगाराकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता थेट एसटी चालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विलास कदम असं या एसटी चालकाचं नाव आहे.
सांगली आटपाडी येथील एसटी आगारामध्ये विलास कदम एसटी चालक म्हणून गेल्या ३३ वर्षांपासून कार्यरत आहेत.विलास कदम हे,गेल्या 33 वर्षांपासून एसटी सेवेत चालक म्हणून कार्यरत आहेत,सध्या आटपाडी आगारमध्ये कार्यरत आहे. 70 दिवसांनी ते निवृत्त होणार आहेत, तर त्यांची 270 दिवसांची रजा शिल्लक आहे. कदम यांच्या पत्नी आजारी असल्यानं त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी 12 व 13 मार्च रोजी सुट्टी मिळावी,असा अर्ज कदम यांनी आटपाडी एसटी आगार प्रमुखांना दिला होता.मात्र सुट्टीचा अर्ज नाकारल्यानं विलास कदम यांच्या पत्नी नलिनी कदम यांनी थेट एसटी प्रशासना विरोधात आंदोलन केलं.
या घटनेमुळे एसटी प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली.
एसटी प्रशासनाकडून संबंधित महिलेच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर आता एसटी प्रशासनाकडून थेट एसटी चालक कदम यांच्यावरदेखील कारवाई करण्यात आली आहे. विलास कदम यांना सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. एसटी चालवत असताना मोबाईलवर बोलल्याचा ठपका ठेवत एसटी विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत कदम यांनी रोज सकाळी १० वाजता एसटी आगारात येऊन हजेरी लावून, कार्यालयीन वेळेत एसटी आगार प्रमुखांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडून जाऊ नये, असे आदेश जारी केले आहेत.