स्पर्धा परीक्षांचा पाया मजबूत करा-प्रा.विठ्ठल कांगणे

0 21

सेलू ( प्रतिनिधी )
शालेय स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षा ही बौद्धिक विकासासाठी तसेच भविष्यातील स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणताही ताणतणाव न घेता, आनंदाने शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जावे आणि स्पर्धा परीक्षांचा पाया मजबूत करावा, असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक प्रा.विठ्ठल कांगणे यांनी केले.
सेलू येथील नूतन विद्यालयाच्या शिष्यवृत्ती परीक्षा विभागांतर्गत मंगळवारी, ४ फेब्रुवारी रोजी आयोजित ‘ परीक्षेला जाता-जाता ‘ या उपक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा.कांगणे बोलत होते. या वेळी एटीएम गुरू आशिष मगर, मुख्याध्यापक संतोष पाटील, किरण देशपांडे, रोहिदास मोगल, बाबासाहेब हेलसकर, विजय धापसे, आशिष मगर, संजय घुगे, नारायण मस्के तसेच शिष्यवृत्ती विभाग प्रमुख सुनील तोडकर आणि गजानन मुळी उपस्थित होते. प्रा.कांगणे म्हणाले, “स्पर्धा परीक्षेची तयारी बालपणापासून झाली पाहिजे. शिष्यवृत्ती परीक्षा ही केवळ आर्थिक मदत मिळवण्याचे साधन नाही, तर ती विद्यार्थ्यांच्या ज्ञान, तर्कशक्ती आणि गणनायोग्यता वाढवण्याचे प्रभावी साधन आहे. यासाठी नियमित अभ्यास, योग्य मार्गदर्शन आणि सराव महत्त्वाचा आहे. सोबतच आईवडिल, शिक्षकांचा सन्मान राखण्याच्या संस्काराची जपणूक करावी.” मुख्याध्यापक पाटील यांनी सांगितले की, नूतन विद्यालयाने शिष्यवृत्तीत परीक्षेत सातत्याने यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेच्या जादा वर्गातून मार्गदर्शन केले जाते‌. यंदाही विद्यार्थी उज्ज्वल यश मिळवतील, असा विश्वास व्यक्त केला. इयत्ता ५ वी व ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा व मार्गदर्शन सत्र सुरू असून प्रवेशपत्राचे वाटप करण्यात आल्याची माहिती श्री.तोडकर यांनी या वेळी दिली. सूत्रसंचालन बाळू बुधवंत यांनी केले. सुनील तोडकर यांनी आभार मानले.

error: Content is protected !!