शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा पाया रचावा- तहसीलदार शंकर हांदेशवार
शांताबाई नखाते प्राथमिक शाळा पाथरी येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
पाथरी / प्रतिनिधी – विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच ज्ञानाचा पाया रचावा व त्याचे उपयोजन पुढील जीवनात करून स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हावे असे पाथरी तहसीलचे तहसीलदार शंकर हांदेशवार यांनी प्रतिपादन केले. वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित शांताबाई नखाते प्राथमिक शाळा पाथरी ता. पाथरी जि.परभणी येथे बुधवार 29 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ.भावनाताई अनिलरावजी नखाते या होत्या तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश लांडगे, गट साधन केंद्र पाथरीचे गटशिक्षण विस्तार अधिकारी गंगाधर कवळासे, विशेष शिक्षक हनुमंत माने, मुख्याध्यापक एन.ई.यादव प्राचार्य के.एन. डहाळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एन. ई.यादव यांनी केले.
विद्यालयातील बालवाडी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.अनेक बहारदार गीतांवर बाल कलाकारांनी उत्कृष्ट नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. वेशभूषा व प्रभावी सादरीकरण हे कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.
सौ.भावनाताई नखाते यांनी अध्यक्षीय समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी सर्व गुण संपन्न व्हावे. सर्वांगीण विकास हेच शिक्षणाचे खरे उद्दिष्ट आहे असे मत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये शिस्त आणि सातत्य याला महत्त्व द्यावे असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळीराम चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन अनुरुद्र आघाव यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.