संघर्षाला यश, सौ.पल्लवी देशमुख यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड
परभणी/प्रतिनिधी
मुलीने मोठे अधिकारी व्हावे हे वडिलांनी पाहीलेले स्वप्न खरे करण्यासाठी संसाराचा गाडा हाकत समोर आलेल्या कौटुंबीक,सामाजिक परिस्थितीशी चार हात करत पिंपळगावच्या कल्याणकर देशमुख घराण्यातील सौ.पल्लवी देशमुख-टोनपे यांनी लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसनी घातली.यामुळे माहेरी आणि परभणीच्या सासरी अशा दोन्ही कुटूंबाला आनंदीत केली.
अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील पल्लवी दत्तात्रय कल्याणकर यांनी आठ वर्षापुर्वी आपल्या कुटुंबीयांच्या मनाविरुद्ध परभणी येथील व्यावसायीक रवी शांताराम टोनपे यांच्याशी विवाह केला व ती सर्वांना परकी झाली. वडीलांनी विचारलेला एक प्रश्न पल्लवी मी तुला शिकवून चुकी केली का त्याच्या उत्तरासाठी… पल्लवी यांनी सर्व बाबीकडे दुर्लक्ष करत काही तरी करुन दाखवयाचे व वडिलांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असा निश्चय केला. सासरी पतीची भक्कम साथ असल्याने पल्लवी यांनी स्पर्धा परिक्षा देण्यास सुरुवात केली.आणि त्यासाठी सुरु झाला खरा संघर्ष.खर तर हा संघर्ष सोपा नव्हता,लग्णानंतरही अधिकारी होता येतं ,आपण निवडलेला मार्ग चुकीचा नाही हे सिध्द करायचे होतं.त्यामुळे खऱ्या अर्थाने पल्लवी यांच्या जिवनातील अस्तिवाचा,त्यांच्यातील पुरोगामी विचारांचा आणि एका स्त्रिच्या स्वातंत्र्याचा संघर्ष होता.त्यामुळे एकीकडे नुकताच फुललेला संसार,पतिशिवाय कोणाचा आधार नाही,अशा संघर्षशिल परिस्थितीत पल्लवी यांनी खंबीर होत स्पर्धा परिक्षेच्या यज्ञात उडी घेतली.
शिक्षणात चार वर्षाचा खंड पडला पण स्वतःमध्ये जिद्द होती काही करायचे. दिडवर्षाची मुलगी, दिवसभर मुलीला सांभाळायचे पती आपल्या व्यावसायीक काम आटोपीन घरी आल्यावर मिळालेल्या थोडक्या वेळेत ती अभ्यासिकेत अभ्यास करत असे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पहिल्या परिक्षेत तिला फक्त २० गुणच मिळाले. निराश न होता तिने आपल्या चुका शोधल्या व पुन्हा जिद्दीने तयारीला लागली.
पिंपळगाव महादेव या छोट्याशा खेडेगावातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील पल्लवी हिने प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत केले, दहावी-बारावी नांदेड येथे झाली. याआधी तिची जिल्हा परिषद चंद्रपूर कनिष्ठ सहाय्यक लेखापदावर निवड झाली,परंतु अधिकारी होण्याची जिद्द असल्याने त्यांनी आपल्या धेय्यासाठी पुन्हा अभ्यास सुरु केला.अखेर आठ वर्षांच्या शर्तीच्या प्रयत्नाला यश आले व महिला पोलीस उपनिरीक्षक होऊन पल्लवी यांनी आपल्या आई वडिलांचे स्वप्न सत्यात उतरविले आहे. ही बातमी कळताच वडिल दत्तात्रय देशमुख यांचा आनंद गगणात मावेनासा झाला.शेवटी बापांच काळीज.मुलीच्या यशाच श्रेय त्यांनी मुलीच्या कष्टाला दिले.आपली मुलगी अधिकारी झाली आणि तिने करुन दाखवल अजुन काय पाहीजे असे देशमुख यांनी सांगीतले….