स्वराज्य संघटना राजकारणात उतरणार; संभाजीराजे छत्रपती यांची घोषणा

1 116

संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडलं. या अधिवेशनात २०२४ साली होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबद्दल संभाजीराजे छत्रपती यांनी मोठी घोषणा केली आहे. २०२४ साली होणाऱ्या निवडणुका लढणारच, असा निर्धार संभाजीराजेंनी व्यक्त केला आहे.

सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, त्यांची कामे करण्यासाठी आता ‘स्वराज्य’ला बाहेर पडावे लागेल, असे मत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले. स्वराज्य संघटनेचे कार्यालय ‘स्वराज्य भवन’चा लोकार्पण सोहळा तसेच संघटनेचे पहिले अधिवेशन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झाले यानिमित्त छत्रपती संभाजी राजे बोलत होते.
संभाजीराजे यांनी राजकारणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक चुरशीची होणार असल्याची आत्तापासूनच चर्चा रंगते आहे.

किती जागा लढवणार?

संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले की, स्वराज्य वाढवायचे आहे, हे निश्चित. नुसता एकच मतदार संघ का. पूर्ण महाराष्ट्रात जायचे, हा माझा मानस आहे. स्वराज्यने किती जागा लढवायच्या हे ठरवले नाही. मात्र, जागा लढवायच्या आहेत. हे निश्चित, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

“स्वराज्य यापुढे सक्षम पर्याय म्हणून येणार आहे. त्यामुळे २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागा. घाबरण्याची गरज नाही. माझा विश्वास आहे, सुसंस्कृत नेता स्वराज्यात येणारचं. आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुण घ्यायचे आहेत,” असेही संभाजीराजेंनी सांगितलं आहे.

“अगोदरच का निवडून देता?”

“आजचे काही प्रस्थापित लोक माजलेले आहेत. या प्रस्थापितांना माझा विरोध आहे. पण, चूक त्यांची नसून आपली आहे. कारण, आपण त्यांना निवडून देतो. नंतर माजल्यानंतर म्हणतो बघून घेऊ. मात्र, अगोदरच का निवडून देता?,” असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे.

“स्वराज्यच्या माध्यमातून जनजागृती करत सामान्य शेतकऱ्यांना…”

“शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि महासंताचं नाव घेत येड्यात काढलं जातं. त्यामुळे आजही वेळ गेलेली नाही. स्वराज्यच्या माध्यमातून जनजागृती करत सामान्य शेतकऱ्यांना ताकद करण्याचं काम करायचं,” असं संभाजीराजेंनी सांगितलं.

“स्वराज्य नावातच एवढी ताकद आहे, की…”

“मला अनेक लोक विचारत होते, स्वराज्यचं ब्रीदवाक्य आणि बोधचिन्ह काय आहे? पण, आम्हाला सर्वांना वाटलं, स्वराज्य नावातच एवढी ताकद आहे, की त्याला ब्रीदवाक्य आणि बोधचिन्ह ठेवण्याची गरज नाही,” असेही संभाजीराजेंनी म्हटलं.

error: Content is protected !!