स्वातंत्र्यवीर सावरकर – एक महापर्व

2 209

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला.
या काव्यपंक्ती द्वारे मातृभूमीला आर्त हाक मारणार्‍या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची आज जयंती. काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना लिहिलेल्या या काव्यपंक्ती मध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची तीव्रपणे जाणीव होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यात त्यांना लहानपणा पासूनच संघर्षाला सामोरे जावे लागले. सावरकरांचा जन्म 28 मे 1883 साली नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झाला. वयाच्या नवव्या वर्षी मातृशोक तर वयाच्या पंधराव्या वर्षी पितृ शोकाला त्यांना सामोरे जावे लागले. संघर्षमय वातावरणात बालपण घालवताना ते इंग्रजांविरुद्धचा स्वातंत्र्य लढा आपल्या डोळ्याने बघत होते. चाफेकर बंधूंच्या बलिदानानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत पेटली. कुलदेवता भगवती समोर राष्ट्रभक्तीची शपथ घेताना जेव्हा एका क्रांतिकारकाचा जन्म झाला होता तेव्हा सोबतच एक लेखक आणि कवी सुद्धा जन्माला आला होता.
जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे
या अजरामर स्वातंत्र्य गीताची रचना सावरकरांनी केली.
तुजसाठी जनन ते मरण, तुज साठी मरण ते जनन
या काव्यपंक्ती द्वारे आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी स्वतःला राष्ट्रभक्तीसाठी वाहून घेतले.
स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय योगदान देण्यासाठी त्यांनी इतिहासाची पाने चाळायला सुरुवात केली आणि 1857 च्या उठावाचा इतिहास जनतेसमोर आणला. 1857 चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक सावरकरांनी लिहिले. त्यांच्या मते 1857 चा उठाव हा फक्त उठाव नसून पहिले स्वातंत्र्य युद्ध होते. हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी सुद्धा त्यांना बराच संघर्ष करावा लागला. मॅडम भिकाजी कामा यांच्याकडून सावरकरांना हे पुस्तक जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी बरीच मदत झाली. 1857 च्या रक्तरंजित क्रांतीने लोकांच्या मनात स्वातंत्र्य प्राप्ती साठी परत एकदा संघर्षाची भावना निर्माण केली. स्वातंत्र्य लढ्यास मूर्तरूप देण्यासाठी तरुणांच्या सहभागाने सावरकरांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली. पण 1909 साली नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याच्या हत्येच्या आरोपाखाली सावरकरांना अटक झाली. सावरकर तेव्हा इंग्लंड मध्ये होते. सावरकरांवर लंडनमध्ये खटला दाखल करण्यात आला. हा खटला भारतात चालवण्यासाठी त्यांना जहाजाने परत नेण्याचा बेत ठरला. हीच ती वेळ ज्यावेळी सावरकरांनी इंग्रजांच्या बंदित असतानाही जहाजातून फ्रान्सच्या मार्सोलीस बंदरात ऐतिहासिक उडी मारून पलायन करण्याचा प्रयत्न केला. ते लगेच पकडले गेले असले तरीही त्यांच्या या ऐतिहासिक उडिने इंग्रजांची बरीच डोकेदुखी केली. त्यांच्या हस्तांतरणाचा आणि भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्‍न अंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर आणि जगा समोर उभा राहिला.
1911 साली त्यांना 25 वर्षाच्या दोन अशी 50 वर्षाच्या काळ्या पाण्याची शिक्षा होऊन अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये पाठवण्यात आले. हे कदाचित खूप कमी जणांना माहीत असेल पण सावरकर यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांना इंग्रज सरकारने देखील अटक करून अंदमानच्या जेलमध्ये ठेवले होते. जेलमध्ये होणार्‍या अनन्वित अत्याचारा नंतरही त्यांचे मनोधैर्य तुटले नाही. पण सावरकरांसारख्या वादळी व्यक्तिमत्वाला जेलमध्ये खितपत पडणे मान्य नव्हते. त्यासाठी त्यांनी इंग्रज सरकारला माफी मागण्याचा बनाव केला. सावरकरांच्या माफीनाम्यावर वारंवार प्रश्‍न उठवणार्‍यांनी आधी काळ्यापाण्याची शिक्षा का झाली हे समजून घ्यायला हवे. काळ्या पाण्याच्या शिक्षेत त्यांच्यावर काय अत्याचार झाले हे पण वाचायला हवे. प्रत्येक माफीचा अर्थ माघारच असतो का याचाही सारासार विचार करावा. शत्रूविरुद्ध पुकारलेले युद्ध जिंकण्यासाठी शक्ती एवढीच युक्ती पण महत्त्वाची असते. सावरकरांनी एक नव्हे तर अनेक वेळेस माफी मागण्याचा बनाव केला पण त्यामागे जेलमधून बाहेर पडून परत स्वातंत्र्यलढा सुरू करण्याचा विचार होता. 1921 साली इंग्रज सरकारद्वारे सावरकरांना अंदमान येथून रत्नागिरीच्या जेलमध्ये पाठवण्यात आले. 1924 साली सावरकरांची काही अटी-शर्ती च्या आधारावर तुरुंगातून मुक्तता करण्यात आली. यातील काही प्रमुख अटी म्हणजे रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध होऊन राहणे, 5 वर्ष सक्रिय राजकारणापासून दूर राहणे.
या अटींमुळे सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्याच्या कार्यावर बर्‍याच मर्यादा आल्या. पण सावरकरांनी समाज कार्याद्वारे परत लोकांचे संघटन आणि प्रबोधन करायला सुरुवात केली. हिंदू धर्माला संघटित करत जातिभेद नष्ट करण्यावर सावरकरांनी भर द्यायला सुरुवात केली. सावरकर जाती विरहित हिंदू धर्माच्या संकल्पनेचे पुरस्कर्ते होते. सावरकरांचा हिंदुत्वाचा प्रवास देखील अंदमानच्या जेल मधूनच सुरू झाला. प्रखर राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाचे पुरस्कर्ते यामुळे काही टीकाकार त्यांच्यावर हिंदू राष्ट्रवादाला जन्म घातल्याचा आरोप करतात. पण अशी टीका करणारे हे सोयीस्करपणे विसरतात की अखंड भारताच्या निर्मितीचे स्वप्न पाहणारे पण सावरकरच होते. हिंदुत्वाचे पुरस्कर्ते असूनही चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न करणारे पण सावरकरच होते. 1937 साली सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले.
त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी 1938 साली झालेल्या 23 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष देखील होते. अध्यक्षीय भाषण करताना सावरकरांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लेखणीला बंदुकीचे स्वरूप प्राप्त करून देण्याचे आवाहन साहित्यिकांना केले. सावरकरांनी लिहिलेली 1857 चे स्वातंत्र्य समर, हिंदुत्व, माझी जन्मठेप ही पुस्तके आजही खूप वाचनीय आहेत. सावरकर हे सदैव उद्दिष्टाला धरून वाटचाल करणारे व्यक्तिमत्व होते. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1952 साली त्यांनी अभिनव भारत या संघटनेचे स्वातंत्र्य प्राप्तीचे उद्दिष्ट साध्य झाल्यामुळे संघटना विसर्जित केली.
देशाला स्वातंत्र्यप्राप्ती मिळवून देण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेत प्र. क. अत्रे यांनी सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी बहाल केली. 2001 साली माननीय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना केंद्र सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा प्रस्ताव राष्ट्रपतीपुढे मांडला होता. हा प्रस्ताव मान्य झाला नसला तरीही सावरकरांचे देश, धर्म, साहित्य क्षेत्रातील अतुलनीय कार्य हे त्यांना युगपुरुष म्हणून संबोधण्यास पुरेसे आहे. सावरकरांना भारतरत्न मिळाला नसला तरीही या युगपुरुषाच्या नावाने आज अनेक पुरस्कार दिले जातात हे पण काही थोडके नसे. या युगपुरुषास त्यांच्या जयंतीनिमित्त परत एकदा त्रिवार अभिवादन.
राहुल बोर्डे, परभणी

error: Content is protected !!