शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सामाजिक दृष्ट्या सजग करावे – हेरंब कुलकर्णी

0 6

सेलू ( प्रतिनिधी )
शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी गप्पा गोष्टी कराव्यात. विद्यार्थ्यांना बोलत करावे. विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवणे ही काळाची गरज आहे. सोबतच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सामाजिक दृष्ट्या सजग करावे. असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेत केले.

नूतन विद्यालय शिक्षण संस्था, सेलू संचलित श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमाला व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने साई नाट्यगृहात बुधवार ( दि. १८ ) रोजी श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमालेचे ४८ वे पुष्प साने गुरूजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त व साने गुरूजी शिक्षक झाले या गोष्टीला शंभर वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने संपन्न झाले. प्रमुख वक्ते म्हणून शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांची उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर हे होते. व्यासपीठावर व्याख्यानमालेचे संयोजक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, केंद्र प्रमुख डॉ. शरद ठाकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना हेरंब कुलकर्णी म्हणाले की, ‘ शिक्षकांनी आपल्या शिकवण्यातील तोच तोपणा दूर करून आपल्यातील यांत्रिकपणा काढून टाकावा. आपल्या शिकवण्यात नाविन्य आणावे. साने गुरूजीसारखी सहानुभूती, उत्कटता, प्रेम शिक्षकांनी अंगी बाळगावी. विद्यार्थी हे शब्दांनी नाही तर अनुकरणाने शिकतात त्यामुळे शिक्षकांनी मोबाईल ऐवजी स्वतः पुस्तके वाचावीत. म्हणजे विद्यार्थीही पुस्तक वाचनाकडे वळतील. केवळ चार भिंतीत विद्यार्थ्यांना न शिकवता शिक्षकांनी शाळा सुटल्यानंतरही आपल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहावे. विद्यार्थ्यांवर राष्ट्रीय संस्कार करावेत. सामाजिक प्रबोधन करणे हे शिक्षकांचे कार्य आहे. ‘ असेही हेरंब कुलकर्णी म्हणाले. व्याख्यानास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, कार्यकारिणी सदस्य दत्तराव पावडे यांची उपस्थिती होती. संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे, पुजा महाजन आणि विद्यार्थ्यांनी ‘ खरा तो एकची धर्म ‘ हे प्रार्थना गीत गायले. प्रास्ताविक व्याख्यानमालेचे संयोजक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. सुभाष बिराजदार यांनी केले. तर आभार प्रदर्शन बाबासाहेब हेलसकर यांनी केले. व्याख्यान यशस्वीतेसाठी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

error: Content is protected !!