“तुकायन”पुस्तकामध्ये समृद्ध विचारांची परिपक्वता आहे -पद्मश्री डॉ. मोहन आगाशे
परभणी, दिनांक 9 – संत तुकारामांची “गाथा” वैद्यकांच्या आईने त्यांना विचारांचे संस्कार रुजवण्यासाठी वाचन करायला सांगितली. वैद्यकांनी संत तुकारामांचे अभंग काळानुरूप विचारांनी मांडले. त्यामुळे वैद्यक जगदीश नाईक यांनी लिहिलेल्या “तुकायन” या पुस्तकामध्ये समृद्ध विचारांची परिपक्वता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री डॉ. मोहन आगाशे (पुणे) यांनी केले.
दिनांक . (९) रविवार रोजी परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये परभणी येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जगदीश नाईक लिखित ” तुकायन ” या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. आगाशे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी इंद्रजित भालेराव यांची उपस्थिती होती. प्रमुख उपस्थिती म्हणून सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ तथा गाथा अभ्यासक डॉ. विकास बाहेकर, लेखक डॉ. जगदीश नाईक, डॉ. रामेश्वर नाईक यांनी स्थान भूषविले.
यावेळी बोलताना डॉ. आगाशे म्हणाले,”जगामध्ये भाषा बदलते पण तत्त्व बदलत नाहीत. परकीय तत्त्ववेत्यांच्या अगोदर आपल्या भारतीय संतांनी भारतीयांसाठी परिपक्व विचार दिलेले आहेत. डॉ. नाईक यांना संस्कारांनी शिकवले. त्यामुळे त्यांनी सोपी गोष्ट करून संतांच्या विचारांच्या आधारे हे पुस्तक माणसांच्या मनोबलासाठी लिहिलेले आहे. त्यांना त्यांच्या आईचे मार्गदर्शन मिळाले आणि त्यामुळे हे पुस्तक ते लिहू शकले. आधुनिक शास्त्र शिकणाऱ्यांनी पूर्वी सांगितलेले ज्ञान जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता हे पुस्तक महत्त्वाचे आहे.”
यावेळी डॉ. बाहेकर यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले,”समाजासाठी उर्मी सांभाळणारे नाईक कुटुंबीय आहेत. या पुस्तकातून संत तुकारामांच्या विचारांचे अंतरंग समजेल.”
तर अध्यक्षीय समारोप करताना कवी इंद्रजित भालेराव यांनी सांगितले की,”संतांना आणि लेखकांना मन कळते. एक संशोधक म्हणून डॉ. नाईकांचे लेखन या पुस्तकाच्या माध्यमातून सिद्ध झालेले आहे. जीवन जगताना नवा अन्वयार्थ नवा दृष्टिकोन हे पुस्तक देते. गाथेत सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत. माणसांचा विवेकीपणा वाढण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. भगवान काळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कवी अरविंद सगर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिलीप शृंगारपुतळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार बाळू बुधवंत यांनी मानले. यावेळी रसिक आणि वाचकांची प्रचंड संख्येने उपस्थिती होती.