सेलू तालुक्यात सोसायट्याच्या निवडणुकीने राजकीय वातावरण तापले
नारायण पाटील
सेलू ,दि 23 ःतालुक्यात होत असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले असून जास्तीत जास्त सोसायट्या आपल्या ताब्यात कशा येतील यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी कंबर कसली आहे .जिल्हा मध्यवर्ती बँक व बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सोसायट्याचे अध्यक्ष व सदस्य मतदार असल्यामुळे या निवडणुकीत चांगलाच रंग भरला जात आहे .कारण या सर्व निवडणुका म्हणजेच येणाऱ्या विधानसभेची नांदी ठरणार आहेत
सेलू तालुक्यात एकंदर ४९ विविध कार्यकारी सोसायट्या असून त्यापैकी ३१ सोसायट्या या निवडणुकीसाठी पात्र आहेत .त्यामध्ये १९ विविध कार्यकारी सोसायटीच्या मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या असून १२ सोसायटीच्या मतदार याद्या अजून प्रसिद्ध होणे बाकी आहे .मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या १९ पैकी फक्त निपाणी टाकळी येथील निवडणूक पूर्ण झाली असून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ११ सोसायटीची निवडणूक कार्यक्रम प्रक्रिया सुरू आहे .त्यामध्ये सेलू, कुपटा , गव्हा,खवणे पिंपरी,राव्हा,वालुर,तांदुळवाडी,चिकलठाणा बु,गुगळी धामणगाव,रायपूर व चिकलठाणा खु.या गांवाचा समावेश आहे .तिसऱ्या टप्यातील सात विविध कार्यकारी सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम सुरू होणे बाकी आहे .यामध्ये झोडगाव,हादगाव खु,धनेगाव,नागठाना,ब्राम्हणगाव प्र .को .,पिंपरी खु ,मोरेगाव या गांवाचा समावेश आहे .मतदार याद्याच प्रसिद्ध होणे बाकी असलेल्या गावात देऊळगाव गात, जवळा जीवाजी ,साळेगाव ,निरवाडी बु ,डासाळा ,तिडी पिंपळगाव ,सिंगटाळा ,बोरकिनी ,नांदगाव ,देवगाव ,वाई व आहेर बोरगाव या गावाचा समावेश आहे .
तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुका पूर्ण होई पर्यंत सेलू बाजार समितीची निवडणूक घेऊ नये व यासाठी लवकरात लवकर या सोसायटीच्या निवडणुका पार पाडाव्यात असे आदेश सहायक निबंधक सेलू यांना आले आहेत .परंतु कर्मचारी वर्ग कमी असल्याने निवडणुका वेळेत घेणे जिकरीचे बनत आहे तरी देखील लवकरात लवकर पात्र असलेल्या सर्व सोसायटीच्या निवडणुका पार पाडण्याचा संबंधित विभागाचा प्रयत्न आहे .परंतु अजूनही १२ सोसायट्याच्या मतदार याद्याच सबंधीताकडून प्राप्त न झाल्याने थोडा विलंब होत आहे .
या सर्व सोसायटीच्या निवडणूक निकलावरच बाजार समिती च्या सतेचा सारीपाट असल्याने सर्व पक्षीय नेत्यांची नजर या निवडणुकांवर आहे .यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे .हे मात्र नक्की