‘त्या’ पुलाचे रखडलेले काम डिसेंबर अखेर मार्गी लागणार – आ.डॉ.गुट्टे
आ. गुट्टे यांच्या प्रयत्नाने कंत्राटदार व कंपनीकडून मशिनरीची जमवा जमव सुरू, परिसरातील ग्रामस्थ झाले समाधानी
(प्रतिनिधी) :-
पूर्णा तालुक्यातील मौजे.वझुर ते रावराजूर प्रजिमा ३५ या रस्त्यावरील गोदावरी नदीवरील पुलाचे काम वर्षानुवर्षे सुरूच आहे. कोणत्या ना कोणत्या कारणास्तव मधल्या काळात ते काम बंद झाले होते. मौजे वझुर, रावराजुर सह परिसरातील अनेक गावातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने सदर बंद पडलेले काम पुनः सुरू करण्याबाबत आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांची भेट घेतली होती. त्यामुळे स्थानिक आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची सतत बैठक घेवून कामाचा आढावा घेत राहिले. तसेच कामास होत असलेल्या विलंब विषयी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
याचे फलस्वरूप म्हणून मे एस.एन. के इन्फ्रास्ट्रक्चर औरंगाबाद कंपनीच्या नावानं टी अँड टी कंपनी आता हे काम करत असून सदर कंपनीने मशनरी आणावयास सुरुवात देखील केली आहे. डिसेंबर २०२४ अखेर किंव्हा अधिकाधिक मार्च २०२५ पर्यंत सदर पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन पुल व रस्ता रहदारीस खुला करून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार गुट्टे यांनी दिली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याने ते आनंदून गेले आहेत.
या विषयी थोडक्यात वृत्त असे की, पूर्णा तालुक्यातील प्रजिमा ३५ पिंगळी ताडलिमला ते वझुर रावराजूर मरडसगाव रस्त्यावर मौजे.वझुर ते रावराजुर रस्तावर गोदावरी नदीवर पुलाचे बांधकाम सुरू झाले होते. कोणत्या ना कोणत्या कारणास्तव सदर पुलाचे बांधकाम थांबवले होते. पुढे आ.डॉ.गट्टे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे औरंगाबाद येथील एस.एन.के. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या वतीने हे काम सध्या टी अँड टी कंपनी सुरू करत आहे. त्यामुळे प्रलंबित काम डिसेंबर २०२४ किंव्हा मार्च २०२५ अखेर पर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
या पुलामुळे गोदावरी नदीच्या दक्षिण भागातील गावांना परभणी तर उत्तर भागातील गावांना गंगाखेड, पालम, लोहा, अहमदपूर, लातूर, परळीकडे प्रवास करणे सोयीचे व कमी अंतराचे ठरणार आहे. आ. गुट्टे साहेब यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कामाला सुरुवात होणार असून अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे.
गंगाखेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झालेल्या या बैठकीत आ.डॉ.गुट्टे यांनी मतदारसंघातील अन्य कामांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच कामाविषयी समाधान व्यक्त करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस एस पाटील, उपविभागीय अभियंता मोरलवार, संबंधित कंत्राटदार तसेच विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.