…तर मी राजीनामा दिला असता’, सुप्रिया सुळेंची मुंडेवर टिका

0 53

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण चांगलंच गाजत आहे. कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्याच सांगण्यावरून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप केला जात आहे. मुंडे यांचे वाल्मीक कराडशी असलेले कनेक्शन पाहता, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सतत्याने केली जात आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भाष्य केलं आहे. असे आरोप माझ्यावर झाले असते तर नैतिकता म्हणून सगळ्यात आधी मी माझ्या पदाचा राजीनामा दिला असता, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात घडणाऱ्या घडामोडी पाहता लोकांना काळजी वाटणारच ना. राजीनामाही घेतला जात नाही. नैतिकता हा विषय सरकारला आवडतच नाही. खंडणीचा मुद्दाही आहेच की. महाराष्ट उद्योगस्नेहींमध्ये वरच्या क्रमांकावर होता. आज खालच्या क्रमावर गेलाय. थँक गॉड, आम्ही सत्तेत नाही, हा निती आयोगाचा रिपोर्ट आहे आणि मी विरोधी पक्षात आहे.

सरकारला सल्ल्याची गरज नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं. याबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राजीनाम्याचा निर्णय त्यांच्या पक्षाचा आहे. अंजली दमानिया, सुरेश धस, क्षीरसागर हे या विषयावर सतत बोलत आहेत. संदीप क्षीरसागर यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिटचा विषय मांडला. असा मुद्दा सोनिया गांधींच्या वेळी उपस्थित झाला होता. त्या मंत्री नव्हत्या, खासदार होत्या. तरी त्यांनी राजीनामा दिला होता. फक्त नैतिकता म्हणून. अशी अनेक उदाहरणं आहेत.

राजीनामा हा राजकीय नाही तर सामाजिक विषय आहे. आर्थिक आणि सामाजिक रँकिंग खाली गेलंय असं निती आयोगाने म्हटलंय. अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ यांना ऐकिव बातम्यांवर अटक झाली होती आणि वर्षभर तुरुंगात गेले. पण इथं तर डॉक्युमेंट आहेत. सत्तेतले आमदार आहेत. आमचा पूर्वग्रह असेल समजा पण सत्तेतल्या लोकांकडूनच बोलत असतानाही काहीच होत नाहीय असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

इतकं तंत्रज्ञान आहे, तरी ५० दिवस झालं एक खुनी मिळत नाही. एक फरार माणूस शोधता येत नाहीय. काय करतेय यंत्रणा? हा गंभीर प्रश्न आहे. ५० दिवसापूर्वी एका सरपंचाची हत्या झाली. त्याचं कुटुंब आणि संपूर्ण महाराष्ट्र न्याय मागतोय. या सरकारने नैतिकता ठेवून न्याय द्यावा इतकीच मागणी असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

पालकमंत्री पदावरून महायुतीत धुसफूस सुरु आहे. त्याबद्दल काही विचारू नका असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, माझा या विषयातला अभ्यास कमी आहे. हे पदही संविधानिक की असवैधानिक आहे हे माहिती नाही. वित्तीय तुटीबद्दल निती आयोगाचा रिपोर्ट आलाय. संतोषचा मारेकरी सापडला नाहीय, सोमनाथला न्याय मिळाला नाहीय. इतकं असताना पालकमंत्रीपदावर वाद होत असतील तर यावर नाही बोलू शकत मी.

error: Content is protected !!