गंगाखेडात थरार..उसाच्या दोन ट्रॉल्या पलटल्या..बालंबाल बचावले….
गंगाखेड,दि 24 ः
गंगाखेड येथील अकोली रेल्वे फाटकावरून कोद्री रस्त्याने साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या उसाने भरलेल्या दोन्ही ट्रॉल्या संत जनाबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या गेटसमोर पलटी झाल्याची घटना मंगळवार २४ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत ट्रॅक्टरच्या पाठीमागे असलेले दुचाकी व तीन चाकी ऑटो चालक बालंबाल बचावले आहे. यात मोठी दुर्घटना टळली असुन शहरातून होत असलेली ऊस वाहतूक शहराबाहेरून करण्याची मागणी शहर वासीयांतून केली जात आहे.
गंगाखेड शहरातील पोलीस ठाण्यासमोर असलेल्या रेल्वेच्या अकोली फाटकावरून कोद्री रस्त्याने साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरमुळे नांदेड पुणे महामार्गांवर नेहमीच दिवसांतून अनेकवेळा वाहतूकीचा खोळंबा होत आहे. यातच अकोली रेल्वे फाटक ते संत जनाबाई नगर कॉर्नर पर्यंत असलेल्या चढतीमुळे उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉल्या घेऊन जाणारे ट्रॅक्टर रेल्वे फाटकावर अडकून पडत असल्याने येथे ट्रॅक्टरला दुसऱ्या ट्रॅक्टरचे हेड लावून चढतीवर ट्रॅक्टर नेऊन सोडले जात आहे.
यातच मंगळवार २४ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर क्रमांक एमएच २२ एडब्ल्यू ५७०५ हा ट्रॅक्टर उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या घेऊन जात असतांना संत जनाबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयासमोरील चढती चढण्यासाठी त्यास अन्य एका ट्रॅक्टरचे हेड जोडण्यात आले. संत जनाबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापुढे ट्रॅक्टर निघताच यास जोडलेल्या ट्रॅक्टरचा दोरखंड तुटल्याने उसाने भरलेल्या ट्रॉल्यासहित घुळतीने मागे येत असलेल्या ट्रॅक्टरच्या दोन्ही ट्रॉल्या संत जनाबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयासमोर रस्त्यावर पलटी झाल्या.
उसाने भरलेला ट्रॅक्टर मागे येत असल्याचे पाहून ट्रॅक्टरच्या मागे असलेल्या दुचाकी, तीन चाकी ऑटो चालकासह अन्य वाहन धारकांनी अति घाई गडबळीने आपली वाहने मागे घेतल्या उसाच्या ट्रॉल्या धाडकन रस्त्यावर पलटी झाल्यानंतर या घटनेत कोणाला जखम झाली नसल्याचे पाहून सुटकेचा श्वास सोडत थरकाप उडविणाऱ्या घटनेतून बालंबाल बचावलो रे बाबा म्हणत आपला मार्ग बदलला. रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी होऊन सर्वत्र ऊस च ऊस झाल्याने तब्बल दिड ते दोन तास वाहतूक खोळंबली होती.