तुका म्हणे : भाग 33 : परिस्थितीनुरूप वर्तन बदल

0 114

 

सोलापूरला वैद्यकीय शिक्षण घेत असताना टीव्ही हॉलमध्ये आम्ही मित्र मंडळी ‘ कास्ट अवे ‘ नावाचा ऑस्कर पुरस्कारप्राप्त चित्रपट पाहत होतो. एक श्रीमंत व्यक्ती विमान अपघातानंतर एकटाच एका बेटावर अडकतो. सुरुवातीस घडलेल्या घटनेमुळे तो प्रचंड अस्वस्थ होतो. त्यानंतर मात्र हळूहळू परिस्थितीला सामोरे जात परिस्थितीशी दोन हात करत तो काही महिन्यांच्या कालावधीनंतर आपल्या मायदेशी परततो. घरी परतल्यावर देखील त्याची देहबोली सुख-दुःख यांना साक्षीरुपाने पाहणारी होती. चित्रपट संपला आम्ही मित्र निघणार तेवढ्यातच बाजूला बसलेले आमचे सीनियर डॉ. मनोज यांनी आम्हास विचारले, चित्रपटात नायकाने संकटांवर मात कशी केली बरे ? कोणी म्हणाले, धैर्याने, संयमाने , चिकाटीने.. डॉ. मनोज पुढे म्हणाले , या सर्व बाबी महत्त्वाच्याच , त्याचबरोबर नायकाची महत्त्वाची भूमिका म्हणजे परिस्थितीनुरूप वर्तन बदलाची… ते म्हणाले, तुकाराम महाराजांनी याबद्दल खूप छान सांगितले आहे , ते असे ,
तुका म्हणे ,
कैं वाहावें जीवन । कैं पलंगीं शयन ॥१॥
जैसी जैसी वेळ पडे । तैसें तैसें होणें घडे ॥ध्रु.॥
कैं भौज्य नानापरी । कैं कोरड्या भाकरी ॥२॥
कैं बसावें वाहनीं । कैं पायीं अनवाणी ॥३॥
कैं उत्तम प्रावर्णे । कैं वसनें तीं जीर्णे ॥४॥
कैं सकळ संपत्ती । कैं भोगणें विपत्ती ॥५॥
कैं सज्जनाशीं संग । कैं दुर्जनाशीं योग ॥६॥
तुका म्हणे जाण । सुख दुःख तें समान ॥७॥
तुकाराम महाराज म्हणतात, अहो कधी आपल्याला डोक्यावर पाणी वाहण्याची वेळ आली तर पाणीदेखील वहावे तर कधीकधी सुखाने पलंगावर झोपावे. जशी वेळ येईल त्याप्रमाणे बदल करून घ्यावे. कधीकधी विविध प्रकारचे पंचपक्वान्न खावे तर कधीकधी कोरड्या भाकरी मिळाल्या तरी देखील खाव्यात. कधी चांगल्या प्रकारच्या वाहनात बसून फिरावे तर कधी अनवाणी पायी देखील जाण्याची वेळ आली तरी चालावे. चांगल्या प्रकारची वस्त्रे मिळाली तर घालावी तर कधी जीर्ण झालेली वस्त्रे घालण्याची वेळ आली तरी घालावीत. संपत्ती असल्यास संपत्तीचा उपभोग घ्यावा तर कधी विपत्तीचाही भोग घ्यावा. कधीकधी संत संगती लाभ होते तर कधी दूर्जनासोबत ही राहावे लागते. तुकोबाराय म्हणतात, ज्ञानी लोक तेच जाणावे की ज्यांना सुख आणि दुःख हे समान वाटते.
आयुष्य म्हटलं की एका सरळ पट्टीत चालणार सुखी आयुष्य तस पाहिले तर अशक्यच. जगताना काही आनंद देणाऱ्या तर काही अप्रिय घटना घडत असतात. बऱ्याच वेळा अशा अप्रिय घटनांना आपण स्वतःस दोष देतो तर कधी इतरांना, परिस्थितीस जिम्मेदार धरतो. कोरोणा कालखंडामध्ये आपल्या मनाची अस्वस्थता प्रचंड वाढली होती परंतु काही जणांनी त्या परिस्थितीवर तात्काळ मात केली त्याचे मुळ कारण म्हणजे त्यांची परस्थितीनुरुप वर्तन बदल करण्याची मानसिकता…
परिस्थितीनुरुप वर्तन बदल :

१) परिस्थितीचा स्वीकार : एखादी अप्रिय गोष्ट आपल्या सोबत घडल्यास सर्वात प्रथम मनामध्ये विचार येतो तो म्हणजे, अशा सर्व वाईट गोष्टी माझ्यासोबतच घडतात! , माझेच नशीब खराब ! अशा विचारांमुळे मनाची अस्वस्थता प्रचंड वाढते व आपण नैराश्यकडे वाटचाल करतो. बऱ्याच वेळा एखादी अप्रिय घटना घडण आपल्या हातात नसत , परंतु त्याची अस्वस्थता, तीव्रता कमी करण नक्कीच आपल्या हातात असत व त्याची पहिली पायरी म्हणजे त्या घटनेचा, परिस्थितीचा स्वीकार.. उदा. कोरोना या विषाणूचा संसर्ग होणे आपल्या हातात नाही. परंतु बर्‍याच जणांनी संसर्गाचा अस्वीकार केल्याने आजाराची लक्षणे वाढीस लागली व रुग्णालयात भरती करावे लागले . उलट संसर्गाची शक्यता ही वाटल्यास लगेच तपासणी केल्याने बऱ्याच जणांना ओपीडी ट्रीटमेंटवरही आराम मिळाला.
२) सांगा कसं जगायचं? : कवी मंगेश पाडगावकर आपल्या एका कवितेत म्हणतात, सांगा कसं जगायचं कण्हत कण्हत की गाणं म्हणत ? आयुष्यात अनेक घटना घडत असतात काही आनंदी तर काही दुःखी करणाऱ्या. परंतु परिस्थितीला तोंड देताना आपल्याकडे दोन मार्ग असतात एक म्हणजे त्या परिस्थितीबद्दल कुरकुर करत, कण्हत कण्हत आणि दुसरा म्हणजे परिस्थितीशी दोन हात करत.. परिस्थितीबद्दल कुरकुर करणाऱ्या मानसिकतेमुळे आपल्या मनाची अस्वस्थता आणखीनच वाढते व परिस्थिती अजूनच वाईट होण्याची शक्यता जास्त असते. त्यापेक्षा परिस्थितीचा स्वीकार करून विवेकी दृष्टीकोनाने परिस्थितीवर मात कशी करता येईल याचा मार्ग शोधत राहणे हे योग्य.
३) अप्रिय परिस्थिती आयुष्यातील एक आव्हान : एखाद्या वाईट घटनेकडे आपण कसे पाहतो यावर देखील आपल्या मनाची अस्वस्थता अवलंबून असते. एखाद्या अप्रिय घटनेकडे संकट म्हणून पाहण्याऐवजी त्या घटनेकडे आपल्या आयुष्याच्या टप्प्यावरील एक आव्हान म्हणून पाहिल्यास आपल्या मनाची अस्वस्थता कमी होण्यास मदत होते. बऱ्याच वेळा आपण पाहतो, काहीजण वाईट परिस्थितीत म्हणतात, आता सगळं संपलंय ! म्हणजेच अशा वेळी ती व्यक्ती त्या घटनेची तुलना संपूर्ण आयुष्याशी करायला लागते. परंतु विवेकाने विचार केल्यास असे कळते की ती अप्रिय घटना आयुष्यातील एक घटना आहे संपूर्ण आयुष्य नव्हे.. मग या घटनेकडे आयुष्यातील आव्हान म्हणून पाहिल्यास आपण त्या परिस्थितीस तोंड देण्यास सज्ज होण्याचा प्रयत्न करतो.
४) परस्थिती बदलासाठी प्रयत्न : कोणतीही परिस्थिती कितीही वाईट असली तरीही प्रयत्न करत राहिल्यास नक्कीच काहीना काही मार्ग निघतो. आता काहीच होणार नाही, सगळं संपलं ! असे म्हटल्यास यास परिस्थिती आणखीनच वाईट होत जाते. उलट आपल्या हातात शक्य आहे तेवढ्या गोष्टींवर भर देण्याचा प्रयत्न केल्यास एक एक अशक्य गोष्टही शक्य होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कितीही वाईट परिस्थिती असो प्रयत्नशील असणे आवश्यक. कास्ट अवे या चित्रपटातील नायक देखील अनेक संकटांना तोंड देत परिस्थितीचा स्वीकार करत आपल्या आवाक्यातील गोष्टींवर भर देत, एक छोटा तराफा बनवून मायदेशी परततो तो त्याच्या स्वतःच्या परिस्थितीनुरूप वर्तन बदलामुळेच..
म्हणूनच तुकोबाराय परिस्थितीनुरूप बदलाचे महत्त्व सांगताना म्हणतात,
कैं वाहावें जीवन । कैं पलंगीं शयन ॥१॥
जैसी जैसी वेळ पडे । तैसें तैसें होणें घडे ॥ध्रु.॥

डॉ. जगदिश ज्ञानोबा नाईक,
मनोविकारतज्ज्ञ, मन हॉस्पिटल परभणी. ९४२२१०९२००

error: Content is protected !!