तुका म्हणे : भाग ३५ : सोवळे – ओवळे :

0 180

 

काल टीव्हीवर राज ठाकरे व त्यांच्या पत्नी यांची मुलाखत ऐकत होतो. राज साहेबांच्या परखड मुलाखतीतील बरेच मुद्दे आम्ही घरी सर्व मंडळी चर्चा करत होतो तेवढ्यात काही शब्द कानी पडले ते म्हणजे कर्मकांड आणि सोवळे-ओवळे… कर्मकांड या विषयी बरीच माहिती होती परंतु सोवळे-ओवळेपणा म्हणजे काय हा प्रश्न मनात घोळत होता. सोवळे ओवळे म्हणजे काय ? असे विचारताच आमच्यायेथे किरायाने नातवांसोबत राहणाऱ्या आजी म्हणाल्या, तुकाराम महाराजांनी याबद्दल खूप काही सांगून ठेवले आहे ते असे,

तुका म्हणे ,
काय धोविलें बाहेरी मन मळलें अंतरीं । गादलें जन्मवरीं असत्यकाटें काटलें ॥१॥
सांडी व्यापार दंभाचा शुद्ध करीं रे मन वाचा । तुझिया चित्ताचा तूं च ग्वाही आपुला ॥ध्रु.॥
पापपुण्यविटाळ देहीं भरितां न विचारिसी कांहीं । काय चाचपसी मही जी अखंड सोंवळी ॥२॥
कामक्रोधा वेगळा ऐसा होई कां सोंवळा । तुका म्हणे कळा गुंडुन ठेवीं कुसरी ॥३॥
तुकाराम महाराज म्हणतात, मन हे आतमधून षडविकाराने मळलेले आहे आणि वरवरचे शरीर काय धुतले आहे ? हे मन आतमधून जन्मभर केलेल्या विकाराने गांधलेले आहे ते असत्यरुपी व्यवहार दोषांनी भरलेले आहे. त्यामुळे दंभाचा व्यापार टाकून दे आणि अंतकरणापासून मन आणि वाचा शुद्ध कर. मग तुझी वाणी व मन शुद्ध झाले की नाही याला तुझे चित्तच तुला आपण होऊन साक्ष देईल. देहामध्ये पाप-पुण्य , विटाळ या कल्पना भरलेल्या आहेत परंतु त्याचा देखील तू कधीही विचार करत नाही. असे असताना सर्व पृथ्वी जी सर्वस्वी सोवळी आहे तिला आपण चाचपत बसलो आहोत. तुकोबाराय म्हणतात, तू अखंड सोवळा होण्यासाठी आपल्या देहाला काम-क्रोधापासून दूर कर आणि आपल्या देहातील शाब्दिक अभिमान गुंडाळून ठेव.
आपण सर्वजण लहानपणीपासून ऐकत आलो आहोत अमुक-अमुक सोवळ्यात आहे त्याला हात लावून विटाळ करू नका. तर बऱ्याच घरी मासिक पाळीतील स्त्रीस स्वयंपाक घरात देखील येण्यास मज्जाव असतो का म्हणून तर ती ओवळ्यात आहे असे म्हटले जाते. परंतु या अनिष्ट परंपरेबद्दल आपण केव्हाही खोलात विचार न करता आजही या परंपरा पाळत आहोत.
सोवळी म्हणजे काय ? : सोवळी म्हणजे पवित्र, शुद्ध, शुभ, लाभदायक इत्यादी प्रकारची गोष्ट होय असे मानल्या जाते.
ओवळी म्हणजे काय ? : ओवळी म्हणजे अपवित्र, अशुद्ध, अशुभ, त्रासदायक, वीटाळलेली गोष्ट होय असे मानल्या जाते.

अनेक शतकांपासून सोवळ्या- ओहळ्याच्या कृतीम कल्पनांनी आपल्या समाजाला पछाडलेले आहे. या गोष्टींचे दुष्परिणामही अनेक वर्ष समाजावर होत राहिले.
तुकाराम महाराजांच्या दृष्टिकोनातून सोवळेपणा :
१) काय बा करिशी सोवळे ओवळे? ! मन नाही निर्मळ वाऊगेची !! : आपण बऱ्याचवेळा एखादी गोष्ट सोवळी तर दुसरी ओवळी असे म्हणतो. परंतु कोणतीही गोष्ट सोवळी किंवा ओवळी मुळात नसतेच , या संकल्पना मुळात आपण त्या वस्तूकडे किंवा व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोनातून तयार होतात. सावळे – ओवळेपणा या संकल्पना आपल्या मनाच्या आहेत. तुकोबाराय म्हणतात, मन निर्मळ नसेल तर हे सोहळे-ओवळे मानण्यात काहीच अर्थ नाही. मुळातच या कल्पना नैसर्गिक नसून कृत्रिम आहेत. कदाचित स्वार्थासाठी, हितसंबंध जपण्यासाठी अशा संकल्पनांचा उगम झाला असावा व त्या परंपरागत होत जाऊन अद्यापही आपण अनुकरण करतो.

२) कामक्रोधा वेगळा ऐसा होई का सोवळा! तुकाराम महाराजांच्या दृष्टिकोनातून सोवळेपणा म्हणजे काम , क्रोध , मत्सर इ. अशा भावनांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करणे. एखादा शुभ्र धुतलेला कपडा, दोरा अश्या गोष्टी सोवळ्या नसून , मनातून इतरांबद्दलचे चांगले विचार, चांगली कृती, आपल्या भावनांवर नियंत्रण यासच आपण सोवळेपणा म्हणू.
३) काय चाचपसी मही जी अखंड सोवळी ! आपण अनेक गोष्टींना सोहळ्या ओवळ्या असे विभाजन करतो. उदा. मासिक पाळी आलेल्या स्त्रीस ओवळ्यातील मानून तिला स्वयंपाक घरात प्रवेश नसणे, देवाच्या मूर्तीची पूजा करू न देणे असे वागवतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केल्यास नियमित मासिक पाळी येण हे निरोगी आरोग्याचे लक्षण होय. प्रत्येक महिन्यात अंडकोषतून (ओहरी) बीजांड बाहेर पडणे व फलन न झाल्यास ते बाहेर फेकल्या जाणे म्हणजेच मासिक पाळी. मग यात ओवळेपणा कसला? तुकोबारायांना तर ही सर्व पृथ्वीच सोवळी वाटते म्हणजेच या जगातील सर्वच गोष्टी या चांगल्या – सोवळ्या आहेत असे ते म्हणतात आणि हे अवलंबून आहे आपल्या दृष्टिकोनावर..
४) सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा ! तुकोबाराय म्हणतात, ते सोहळ्या ओवळ्या या दोन्ही कल्पनेच्या पलीकडे गेले आहे. ते म्हणतात, प्रत्यक्ष भगवंतानेच (निसर्गानेच) सोवळे-ओवळे असा द्वेतभाव ठेवला नाही तर आपण मनुष्यप्राणी हा द्वैतभाव का करतो ? म्हणूनच ते या दोन्ही संकल्पनांच्या पुढे जाण्यास सांगतात.
सोवळे-ओवळेपणा या संकल्पनांना दूर करण्यास तुकाराम महाराजांनी त्या काळी सांगितले होते परंतु आजही आपण या अनिष्ट रुढीपरंपरांमध्ये जखडून बसलेलं आहोत. यामागील मूळ कारण म्हणजे अज्ञान, भीती व अवैज्ञानिक दृष्टिकोन. मग या ओवळेपणास सोवळ्यात बदलायचं असेल तर आवश्यक आहे विवेकी , वैज्ञानिक , बुद्धीप्रामाण्यवादी दृष्टिकोन..

डॉ. जगदिश ज्ञानोबा नाईक
मनोविकारतज्ज्ञ, मन हॉस्पिटल,
परभणी ९४२२१०९२००

error: Content is protected !!