वीज दर स्वस्त होणार! अर्थसंकल्पात घोषणा
गेल्या काही वर्षांपासून वाढत्या वीजदरांमुळे राज्यातील प्रत्येक सरकार सातत्याने जनतेच्या रोषाचा सामना करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. करोनामुळे (Covid-19) राज्यात लॉकडाऊन लावलेला असताना राज्यातील लाखो कुटुंबांना अनेक पटींनी अधिक वीजबिलं भरावी लागली होती. तेव्हाच्या सरकारला देखील जनतेच्या संतापाला सामोरं जावं लागलं होतं. राज्यातील विद्यमान महायुतीच्या सरकारने निवडणुकीच्या आधी प्रचारकाळात वीज दर कमी करण्याबाबत घोषणा केली होती. दरम्यान, आज राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात वीजेचे दर कमी होतील अशी घोषणा केली आहे.
वीजनिर्मित्ती आणि नागरिकांना वीजेचा लाभ
महावितरण कंपनीने येत्या 5 वर्षांसाठी वीजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे. ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये १ लाख १३ हजार कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे, राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील.