आम्हाला 72 लाख मत,त्यांना 58 लाख तरी त्यांचे आमदार जास्त कसे आले..शरद पवारांनी सांगीतल
विधानसभा निवडणुकीत विरोधकांना पराभवाचा मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीच्या राज्यात केवळ 50 जागा आल्या तर दुसरीकडे महायुतीने राज्यात तब्बल 231 जागा जिंकल्या. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर शंका व्यक्त केली जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी आकडेवारी सादर करत महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“शरद पवार गटाची विधानसभा निवडणुकीतील मतं 72 लाख आहेत. मात्र, आमचे उमेदवार 10 निवडून आलेत. अजित पवारांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे 41 उमेदवार निवडून आले आहेत. 80 लाख मत मिळालेल्या पक्षाचे 15 तर 79 लाख मतं मिळालेल्या पक्षाचे 57 आमदार निवडून येतात. असं कॅलक्यूलेशन आहे, आम्ही याच्या खोलात गेलेलो नाही. जोपर्यंत आमच्याकडे आधार नाही, तोपर्यंत याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. मात्र, मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत”, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, चार निवडणुका आत्ता झाल्या आहेत. हरियाणामध्ये मी स्वत: गेलो होतो. तिथं भाजपची अवस्था अतिशय कठिण होती, पण तिथे भाजपा सत्तेवर आली. काश्मीरमध्ये निवडणूक झाली. तिथे फारुक अब्दुल्ला यांचा पक्ष आला. महाराष्ट्राची निवडणूक झाली. इथं भाजपला यश आलं. मात्र, झारखंडला मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यामुळे सत्ताधारी पक्ष सांगू शकतात की, एका निवडणुकीत तुम्ही जिंकलात, एका निवडणुकीत आम्ही जिंकलो. ईव्हिएमचा काही संबंध नाही. मोठी राज्य आहेत, तिथे भाजप आहे, आणि छोटी राज्यं आहेत, तिथं अनेक पक्ष आहेत.
विधानसभा निवडणुकीत वातावरण अनुकूल होतं पण निकाल अनुकूल लागला नाही. ईव्हीएमबाबत माझ्याकडे अधिकृत आकडेवारी नाही, त्यामुळं यावर आताच बोलता येणार नाही. महायुतीकडे बहुमत आहे हे मान्य केलं पाहिजे. मतांचे आकडे हे आश्चर्यकारक आहेत. काँग्रेस पेक्षा शिंदे यांना मतं कमी आहेत पण त्यांचे जास्त आमदार निवडून आलेत. ईव्हीएम बाबत शंका घेण्याचं कारण नाही. काही ठिकाणी भाजपचा पराभव देखील झाला आहे. पण मोठी राज्य भाजपकडे गेली आहेत, असंही पवार यांनी सांगितलं.