आगामी विधानसभा निवडणुकीत यश पुन्हा खेचून आणू – आ.गुट्टे
(प्रतिनिधी) :-
राजकारणामध्ये हार-जीत होत असते. पराजयाने खचून न जाता काम करीत राहिले पाहिजे. त्यामुळे अगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, नगरपालिका निवडणुकीत मोठ्या ताकदीने लढू आणि जिंकू. तसेच पुन्हा यश खेचून आणू, असा विश्वास गंगाखेडचे रासप आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक लाईव्ह द्वारे मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी अनेक लोक त्यांच्या ऑनलाईन संवादात सहभागी झाले होते. तसेच शेकडोंनी कमेंट्स, लाईक आणि शेअर करून आ.डॉ.गुट्टेच्या फेसबुक लाईव्हचे कौतुक केले.
पुढे आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाने नोंद घेण्यासारखी कामगिरी केली आहे. जानकरांना ४ लाख ६७ हजार २८२ मते पडली. परंतु, त्यांचा निसटता पराभव झाला. तरी मतदारांनी दिलेले आशीर्वाद महत्त्वाचे आहेत. म्हणून माय-बाप जनतेचे मन:पूर्वक आभार.
पुढे त्यांनी महायुतीचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घेतलेले परिश्रम आणि कष्ट यांचाही आवर्जून उल्लेख केला. तसेच भविष्यात महायुतीची हि वज्रमूठ प्रभावी ठरेल. त्यातून केवळ जिल्ह्यात नव्हे तर, राज्यभर यश येईल, असेही सूतोवाच केले आहे.
या फेसबुक लाईव्ह द्वारे आ.डॉ.गुट्टे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघात झालेली विकासकामे, सुरू असलेली कामे आणि प्रस्तावित योजना मांडल्या. तसेच प्रत्येक कामाची गरज, मंजूर प्रक्रिया आणि निधीची उपलब्धता, अशी विस्तृत माहिती दिली. तसेच मतदारसंघातील जनतेने आगामी काळात असेच सोबत राहावे. आशीर्वाद आणि शुभेच्छा द्याव्यात. त्यांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही, असेही म्हटले आहे.
.तर त्यांचा योग्य वेळी समाचार घेवू – आ.डॉ.गुट्टे
सामाजिक बांधिलकी जोपासून राजकीय क्षेत्रात काम करीत असताना काही लोक माझ्यावर सातत्याने आरोप करीत आहेत. कारण, त्यांना माझ्या सोबत असलेल्या जनतेची धडकी भरली आहे. माझा लोकसंपर्क आणि जनतेच्या मनात असणारे स्थान विरोधकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. म्हणून ते काहीही बरळत आहेत. नाहक आरोप करून माझी बदनामी करीत आहेत. परंतु, त्यांचा योग्य वेळी समाचार घेवू, असाही इशारा आ.डॉ.गुट्टे यांनी फेसबुक लाईव्हच्या शेवटी दिला आहे.