जिल्हा परिषदेत विविध उपक्रमांनी महिला दिन उत्साहात साजरा
परभणी,दि 08 ः
शनिवार दिनांक 8 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आयोजन जिल्हा परिषदेच्या सभागृहात महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, उप मुख्य कार्यकारी (सामान्य प्रशासन) ओमप्रकाश यादव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) रेखा काळम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छ भारत मिशन) शिवराज केंद्रे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आशा गरुड, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता आर जी स्वामी यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या विषयावर व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आले प्रोबोधन
महिलांचे आरोग्य आणि बदलती जीवन शैली, नवीन प्रेरणा आणि आत्मविश्वासाच्या दिशेने एक पाऊल, तणाव कमी करण्याचे सोपे आणि प्रभावी मार्ग शिकून घ्या, ध्यानाने मानसिक शांती आणि समाधान मिळवा, समस्यांवरील सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घ्या अशा विविध विषयावर आधारित जागतिक महिला दिना निमित्त एक पाऊल नवजीवनाच्या दिशेने या विषयाला अनुसरून महिलांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने तेजज्ञान फाउंडेशन पुणे यांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी पाणी, स्वच्छता व आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव देखील करण्यात आला.
बेटी बचाओ – बेटी पढाओ या मोहिमेला १० वर्ष पूर्ण झाले त्या अनुषंगाने लेक लाडकी योजनेतील लाभार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
महिलांचा सन्मान करणे गरजेचे – सीईओ नतिशा माथूर यांचे आवाहन
सर्वांनी प्रथम शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे.कुटुंबातील मुली प्रमाणे मुलांना पण चांगल्या गोष्टी शिकविल्यास वाईट घटना घडणार नाहीत. एक मुलगी असून आपल्याला स्वतः घरच्यांकडून आणि पुढे पतीकडून प्रोत्साहन मिळाल्यामुळेच आपण भारतीय प्रशासन सेवेत येऊ शकलो, महिला – मुलगी आर्थिक सक्षम होणे आवश्यक आहे. समाजामध्ये शिक्षणाची, संधीची, आर्थिक स्वरूपाची समानता येणे महत्वाचे असून प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे व महिलांचा सन्मान प्रत्येकाने करण्याचे आवाहन माथूर यांनी केले.
महिलांनी आपलं स्त्रीत्व आणि स्वाभिमान जपले पाहिजे – ऍड सीईओ रश्मी खांडेकर
कुटुंब आणि समाजात महिलांनी आपलं स्त्रीत्व आणि स्वाभिमान जपण्याचे आवाहन रश्मी खांडेकर यांनी केले. कुटुंब चांगले राहण्यासाठी स्त्रीने समन्वय साधावा,संयम, स्वभाव आणि कर्तृत्वाने महिलांनी आपलं वेगळे स्थान निर्माण केले पाहिजे, तसेच नवविवाहित मुलींनी कुटुंबात सामंजस्याची भूमिका घेऊन संसार करावा, महिलांनी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करत आयुष्याचा आनंद घेण्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) रेखा काळम यांनी केले. महिला कुठल्याच क्षेत्रात कमी नाहीत त्या नेहमी कार्यतत्पर असतात थोडी कार्यतत्परता त्यांनी स्वतःसाठी दाखवावी स्वतःला वेळ देऊन सन्मानाने जगणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डॉ. रेवती महाजन यांनी महिलांचे आरोग्य आणि बदलती जीवन शैली या विषयावर समयोचित मार्गदर्शन केले.
यावेळी सूत्रसंचालन कनिष्ठ प्रशासन अधिकारी मनोज कन्नावर यांनी तर आभार कनिष्ठ प्रशासन अधिकारी माधुरी कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) रेखा काळम यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ प्रशासन अधिकारी सदानंद पेकम,अंजली आलेवार यांच्यासह महिला व बाल कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.