होय आमच्या महायुतीत समन्वय,जिल्ह्यातील नेत्यांचा दावा…..महामेळावा होणार
परभणी,दि.12(प्रतिनिधी) :आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुती सज्ज असुन कोणतेही मतभेद न बाळगता
राज्याप्रमाणेच जिल्ह्यातसुध्दा महायुतीतील घटकपक्षात व नेतेमंडळींमध्ये समन्वय आहे असा दावा दावा महायुतीतील नेत्यांनी सावली विश्राम गृह येथे शुक्रवार (दिनांक12 जानेवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला.
शहरातील पाथरी रोडवरील श्री रेणुका मंगल कार्यालयात रविवारी (दि.14) सकाळी 11 वाजता भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि 12 मित्रपक्षांच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मकरसंक्रातीनिमित्त महामेळावा आयोजित केला आहे. त्याबाबतची माहिती देण्यासाठी महायुती समन्वय समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार हरिभाऊ लहाणे, जिल्हा प्रमुख व्यंकटराव कदम, माधवराव कदम, माजी आमदार मोहन फड, महानगरचे माजी जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य संजय शेळके यांच्यासह अन्य यावेळी उपस्थित होते.
राज्याप्रमाणे जिल्ह्यातील महायुतीतील घटकपक्षात व नेतेमंडळीत सातत्याने सुसंवाद आहे. समन्वय कायम आहे, असा दावा सार्या नेतेमंडळींनी केला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत महायुतीतील समन्वयाचा संदेश जावा, या दृष्टीने 14 जानेवारी रोजी पाथरी रस्त्यावरील रेणूका मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा विशेष मेळावा आयोजित करण्यात आला आहे, असेही नमूद केले.